Mumbai Contaminated Water pudhari photo
मुंबई

Mumbai Contaminated Water : आधीच कपात, त्यात दूषित पाणी!

प्रशासनाकडून कार्यवाही नाही; पाणी प्यायचे तरी कसे, मुंबईकरांसमोर प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आधीच मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार असताना मुंबई शहर व उपनगरातील काही भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबतच्या तक्रारी महापालिका विभाग कार्यालयात येत आहेत. यामध्ये दहिसर, बोरिवली, कुर्ला, मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी आदी भागात दूषित व गढूळ पाण्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने आल्या आहेत. दूषित पाणी रोखण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्यामुळे पाणी प्यायचे तरी कसे, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

पश्चिम व पूर्व उपनगरात गेल्या काही दिवसांपासून गढूळ व दूषित पाण्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. दररोज पाच ते सहा तक्रारी विभाग कार्यालयात नोंदवल्या जात आहेत. गेल्याच आठवड्यात गोरेगाव येथे येणाऱ्या दूषित पाण्याबद्दल भाजपा नगरसेविका प्रीती सातम यांनी आवाज उठवला होता.

गढूळ व दूषित पाण्याची बाटली स्थायी समितीत बसलेल्या अतिरिक्त आयुक्तांकडे सुपूर्द केली होती. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मुंबईत अनेक ठिकाणी गढूळ व दूषित पाणी येत असल्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, असे निर्देश दिले आहेत.

दूषित अथवा गढूळ पाणी हा आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे तक्रार आल्यानंतर त्याची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. पण अनेकदा तक्रार करूनही महिनाभर पाण्यामध्ये सुधारणा होत नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी विकास पाणी घ्यावे लागत आहे. अनेकदा कपडे धुणे व आंघोळ करण्याइतके ही पाणी स्वच्छ नसल्यामुळे टँकर मागवावे लागत आहेत. त्यामुळे दूषित पाणी तातडीने थांबवण्यासाठी त्या त्या भागाचा सर्वे करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

दरम्यान दूषित पाण्याची पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा यांनी गंभीर दखल घेतली आहे. दूषित पाण्याच्या तक्रारीचा लवकरात लवकर निपटारा करून, मुंबईकरांना स्वच्छ पाणी देण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न राहणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

सर्वाधिक तक्रारींचे प्रभाग

विभाग - प्राप्त तक्रारी

गोवंडी एम पूर्व - 4 ते 5

कुर्ला एल विभाग - 5 ते 6

सांताक्रुझ एच पूर्व - 3 ते 4

अंधेरी के पूर्व - 5 ते 6

मालाड पी उत्तर - 6 ते 7

दहिसर आर उत्तर - 3 ते 4

प्रभादेवी जी दक्षिण -3 ते 4

परळ एफ दक्षिण - 2 ते 3

दूषित पाणी शोधणे अवघड

एखाद्या भागात दूषित अथवा गढूळ पाणी येत असेल तर ते पाणी नेमके कुठून येते याचा शोध घेण्यात येतो. परंतु अनेकदा नेमकं स्वच्छ पाण्यामध्ये दूषित पाणी कुठून जाते याचा तपास करणे शक्य होत नाही. सर्व जलवाहिन्या भूमिगत असल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे खोदून जलवाहिनीमध्ये कुठे पाण्याची गळती आहे का याची शहानिशा करावी लागते. परंतु तक्रार आल्यानंतर तातडीने दखल घेऊन, दूषित पाणी थांबवण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येत असल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागातील वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT