Kavthemahankal taluka Water Crisis : पूर्वभागातील बहुतांशी तलावांनी गाठला तळ

केवळ 37 टक्के उपयुक्तपाणीसाठा शिल्लक ; पाणी-चारा टंचाईचे सावट
Kavthemahankal taluka Water Crisis
कवठेमहांकाळ : पाणीपातळी तळाला गेलेला लंगरपेठ तलाव
Published on
Updated on

- दिलीप जाधव

कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्वेकडील भागात पाणीबाणी निर्माण झाली आहे. तालुक्यातील एकूण 11 पैकी बहुतेक तलावातील पाणीपातळी 25 टक्क्यांच्या खाली गेली आहे. सर्व तलावात मिळून फक्त 37.64 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

कुची, रायवाडी, घोरपडी आणि बसापाचीवाडी तलाव हे अपवाद वगळता संपूर्ण भाग भीषण टंचाईच्या छायेत सापडला आहे. अजून उन्हाळ्याचा सव्वा महिना बाकी असताना ही परिस्थिती आहे. काही दिवसांतच टंचाईचे चित्र भीषण होणार आहे. पिण्याचा पाणीप्रश्न आणि शेतीचा प्रश्न ऐरणीवर येत असताना, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची कसोटी लागणार आहे. एकूण परिस्थिती पाहता तालुक्यात वैशाख वणवा आहेे.

उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्यावर या पाणी साठ्यावर मोठा ताण येणार आहे. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच कवठेमहांकाळ तालुक्याला टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. गतवर्षीच्या पावसाळ्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तलावांतील पाण्याची पातळी वेगाने घसरल्याने आगामी काळात तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीसाठी पाण्याचा तुटवडा आणि चाऱ्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे.

‌‘म्हैसाळ‌’मुळे नदीकाठच्या गावांना दिलासा

म्हैसाळ योजनेचे पाणी गव्हाण बंधाऱ्यातून अग्रणी नदी पात्रात सोडण्यात आले असून, कवठेमहांकाळ तालुक्यातील बंधारे भरून घेतले जाणार आहेत. आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नियोजन करण्यात आले. या पाण्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील नदी काठालगतच्या मळणगाव, शिरढोण, तिरमलवाडी तसेच पुढील गावांच्या परिसरात दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे.

उपाययोजनांची गरज

मे महिन्याच्या उंबरठ्यावर कवठेमहांकाळ तालुक्यात टंचाईच्या झळा बसत आहेत. काही ठिकाणी स्रोत आटण्याच्या मार्गावर आहेत. पाणीपुरवठा योजनांचे काटेकोर नियोजन करणे, उपलब्ध साठ्याचे समतोल वितरण आणि गळती रोखण्यासाठी दुरुस्ती यावर भर देणे आवश्यक आहे. प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर टंचाई अधिकच तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सिंचन योजनांचे पाणी सोडण्याची मागणी

तालुक्यात टंचाई भीषण रूप धारण करत असताना म्हैसाळ योजनेतून बंडगरवाडी, नांगोळे, बसाप्पाचीवाडी, लांडगेवाडी व कुची येथील तलावांमध्ये पाणी सोडण्याची मागणी होत आहे. टेंभू सिंचन योजनेतून लंगरपेठ आणि दुधेभावी येथील तलाव भरता येऊ शकतात. यातून शेतीस आवश्यक पाणी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news