मुंबई : राजेश सावंत
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरातच तिघांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांना ही आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे कुलाबा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अनेकांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे वचन देऊनही नार्वेकर यांनी कुटुंबाला प्राधान्य दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कुलाबा विधानसभा मतदार संघात कोणाला उमेदवारी द्यायची हे सर्वस्वी विधानसभा अध्यक्ष व स्थानिक आमदार म्हणून राहुल नार्वेकर यांच्यावर जबाबदारी होती. परंतु मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नार्वेकरांच्या घरातील तिघांना उमेदवारी मिळाल्यामुळे नार्वेकरांनी कार्यकत्यपिक्षा कुटुंबाचा विचार केल्याचे स्पष्ट होते. कुलाबा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांचा नार्वेकर यांच्याकडून अक्षरशः वापर करून घेतल्याचा आरोपही काही पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. महापालिका निवडणुकीत आपल्याला उमेदवारी दिली जाईल, असे अनेक कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यामुळे अनेक कार्यकर्ते नार्वेकर निवडून येण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत होते. अनेक कार्यकर्त्यांनी नार्वेकर यांच्यासाठी माजी आमदार राज पुरोहित यांच्याशीही वैर घेतले. पण नार्वेकर हे कार्यकर्त्यांचे नसल्याचे दिसून आले आहे.
कुलाबा विधानसभेतील पालिकेच्या ए विभाग कार्यालयाचे अधिक २२५, २२६ व २२७या तीन प्रभाग आहेत. या तिन्ही प्रभागात नार्वेकर यांनी बंधू मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर व चुलत बहीण गौरवी शिवलकर-नार्वेकर यांना उमेदवारी दिली. वास्तविक नार्वेकर यांनी यातील दोन प्रभागात कार्यकर्त्यांना उमेदवारी देणे अपेक्षित होते. मात्र ज्यावेळी कार्यकर्ते उमेदवारीसाठी नार्वेकर यांचे कार्यालयात चपला झिजवत होते. त्यावेळी नार्वेकर यांनी माझ्या हातात काही नसल्याचे सांगत, सर्व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष अमित साटम, पालकमंत्री अॅड. आशिष शेलार असल्याचे सांगत कार्यकर्त्यांपासून दूर पळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अजूनच जीवाला लागले आहे.
नार्वेकरांच्या उमेदवारांना पाडण्यासाठी जोरदार फील्डिंग
आमदार राहुल नार्वेकर यांच्या कौटुंबिक उमेदवारांना पाडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीच नाही तर कुलाबा विधानसभेतील दोन्ही शिवसे-नेच्या शिवसैनिक व काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे ही निवडणूक नार्वेकरांसाठी सोपी राहिली नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान नार्वेकर यांची चुलत बहिणीच्या विरोधात माजी नगरसेविका सुजाता सानप यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.