Coastal Road Accident Pudhari
मुंबई

Coastal Road Accident: कोस्टल रोड की रेसिंग ट्रॅक? अडीच वर्षांत १२ हाय-एंड कार अपघात; सात जणांचा मृत्यू

अडीच वर्षांत महागड्या कारचे १२ अपघात; सात जणांचा मृत्यू ; ११ वाहने जमा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास वेगवान व्हावा म्हणून उभारलेला कोस्टल रोड आता रात्रीच्या वेळी काही हाय-एंड कारचालकांसाठी ‘रेसिंग ट्रॅक’ बनत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.

लक्झरी आणि उच्च क्षमतेच्या गाड्या भरधाव वेगाने चालविणे, एकमेकांना धोकादायकरीत्या ओव्हरटेक करणे, रेसिंगचे व्हिडीओ तयार करणे आणि ते सोशल मीडियावर प्रसारित करणे, या प्रकारांमुळे वेगाचा हा थरार जीवघेणा ठरत आहे.

अलीकडच्या काळात कोस्टल रोडवर हाय-एंड कारच्या अपघातांची मालिकाच समोर आली असून, अडीच वर्षांत १२ अपघातांत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

सप्टेंबरच्या सुरुवातीला कोस्टल रोडच्या बोगद्यात लॅम्बोर्गिनी, बीएमडब्ल्यूसह सहा-सात महागड्या गाड्या वेगाने धावत असल्याचा व्हिडीओ समोर आला.

यापूर्वीही वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या १६ वाहनांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून ओळख पटवण्यात आली असून त्यापैकी ११ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

अडीच वर्षांत १२ अपघात; सात मृत्यू

कोस्टल रोडचा सिग्नलविरहित १०.५८ किलोमीटरचा मार्ग वाहनचालकांना वेग वाढवण्याची संधी देतो. या मार्गावर सरळ रस्त्यावर कमाल वेगमर्यादा ८० किलोमीटर प्रतितास आहे. बोगद्यात ती ६०, तर वळण आणि मार्ग एकत्र येण्याच्या ठिकाणी ४० किलोमीटर प्रतितास आहे.

२२ सप्टेंबरच्या पहाटे कोस्टल रोडवरील लोटस जेट्टीजवळ भरधाव बीएमडब्ल्यू कठडा तोडून खाली कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.

४० हजार ई-चलन; ७० टक्के वेगासाठी

कोस्टल रोडवर सप्टेंबर २०२४ पासून सुमारे ४० हजार ई-चलन जारी करण्यात आली आहेत. त्यापैकी ७० टक्के ई-चलन वेगमर्यादा उल्लंघनासाठी असल्याचे वाहतूक पोलिसांच्या माहितीतून समोर आले आहे. त्यामुळे या मार्गावरील अतिवेग हा एखाद्या-दोन घटनांपुरता मर्यादित प्रश्न नसल्याचे स्पष्ट होते.

कॅमेरे बंद; कारवाईसमोर तांत्रिक अडथळा

वेगमर्यादा उल्लंघन आणि रेसिंग रोखण्यासाठी सीसीटीव्ही तसेच स्वयंचलित नंबरप्लेट ओळख यंत्रणा महत्त्वाची आहे. मात्र कोस्टल रोडवरील १६५ सीसीटीव्हींपैकी ३४ कॅमेरे केबल चोरीमुळे बंद असल्याची माहिती पुढे आली आहे.

कोस्टल रोडनंतर हे मार्गही रडारवर

वरळी-वांद्रे सी-लिंक : कोस्टल रोडला जोडलेला हा नियंत्रित प्रवेशाचा वेगवान मार्ग आहे. मात्र येथे संघटित कार रेसिंगचा ताजा अधिकृत आकडा उपलब्ध नसला तरी या मार्गाला थेट ‘रेसिंग हॉटस्पॉट’ म्हणता येणार नाही.मात्र सध्या वेगमर्यादा आणि वाहतूक शिस्तीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.

वांद्रे परिसर : रात्रीच्या वेळी वेगवान आणि बेदरकार वाहन चालविणे हा वाहतूक सुरक्षेचा मुद्दा आहे. मात्र उपलब्ध ताज्या नोंदींच्या आधारे संपूर्ण वांद्रे परिसराला ‘रेसिंग स्पॉट’ म्हणता येणार नाही. गेल्या काही दिवसांत येथे रात्रीच्या वेळी वाहनांची वर्दळ वाढली आहे.

जुहू-विलेपार्ले : उच्च क्षमतेच्या वाहनांच्या अपघातांच्या घटना या भागात यापूर्वी नोंदल्या गेल्या आहेत. मार्च २०२६मध्ये जुहूतील रहिवासी रुषभ अनेजा यांची बीएमडब्ल्यू नियंत्रण सुटल्याने बाजूच्या कठड्यावर आदळली होती. हा मार्गही रेसिंगसाठी आकर्षणाचा विषय बनू लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT