Mumbai Coastal Road Fire Pudhari
मुंबई

Mumbai Coastal Road Fire: मुंबईच्या कोस्टल रोड बोगद्यात कारने घेतला पेट; 500 हून अधिक वाहने अडकली, जीव वाचवण्यासाठी...

Mumbai Coastal Road Fire: मुंबईच्या कोस्टल रोड बोगद्यात एका कारला अचानक आग लागल्याने बोगद्यात धुराचे मोठे लोट पसरले आणि सुमारे 450 ते 500 वाहने अडकून पडली.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Coastal Road Fire: दक्षिण मुंबईतील बहुचर्चित कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला अचानक आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. बोगद्यात धूर पसरल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि शेकडो वाहने अडकून पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बोगद्यातून जात असलेल्या एका कारमधून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच कारने पेट घेतल्याने बोगद्यात एकच गोंधळ उडाला. धुराचे मोठे लोट संपूर्ण बोगद्यात पसरल्यामुळे मागील वाहनचालकांनी तातडीने आपापली वाहने थांबवली.

450 ते 500 वाहने बोगद्यात अडकली

घटनेनंतर कोस्टल रोडवरील वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. त्यामुळे बोगद्याच्या आत सुमारे 450 ते 500 वाहने अडकून पडली. अनेक प्रवासी गाड्यांमधून बाहेर उतरून नेमकं काय घडलं याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते.

काही वाहनचालकांनी धुराचे प्रमाण वाढत असल्याचे पाहून सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहने सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही काळ बोगद्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अग्निशमन दल आणि पोलिसांची तातडीने धाव

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलिस, वाहतूक पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने तातडीने कारवरील आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले, तर वाहतूक पोलिसांनी बोगद्यात अडकलेल्या वाहनांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना रिव्हर्स घेऊन बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर हळूहळू वाहने बाहेर काढण्यात आली आणि मार्ग मोकळा करण्यात आला.

नरीमन पॉइंटकडील वाहतूक थांबवली

घटनेनंतर काही काळ नरीमन पॉइंटहून कोस्टल रोडकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहनांचा ताण वाढला.

या घटनेचा परिणाम पेडर रोड, भुलाभाई देसाई रोड आणि परिसरातील इतर प्रमुख रस्त्यांवरही झाला. अनेक ठिकाणी सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये बोगद्यात धुराचे मोठे लोट दिसत असून, शेकडो वाहने जागच्या जागी उभी असल्याचे दिसते. काही प्रवासी गाड्यांमधून उतरून मदतीची वाट पाहताना दिसत आहेत.

आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही

कारला आग कशामुळे लागली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संबंधित यंत्रणा या घटनेचा तपास करत असून तांत्रिक बिघाड, शॉर्टसर्किट किंवा इतर कोणते कारण होते का, याची चौकशी केली जाणार आहे.

मोठी दुर्घटना टळली

मुंबईतील वरळी ते मरीन लाइन्स दरम्यानचा सुमारे 11 किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग मानला जातो. अशा महत्त्वाच्या बोगद्यात आग लागल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, प्रशासनाची तत्परता, अग्निशमन दलाची कारवाई आणि वाहनचालकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT