Mumbai Environment Project
मुंबई : सागरी किनारा मार्गालगत 70 हेक्टर हरित क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. याची जबाबदारी रिलायन्स फाऊंडेशनकडे देण्यात आली असून यामुळे पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होईल.
खासगी कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विकसित करण्यात येणार्या या हरित क्षेत्रात शहरी जंगल तयार केले जाणार असून मियावाकी झाडे, स्थानिक प्रजातींचा समावेश असलेले पर्यावरणीय उद्यान, फुलपाखरू उद्यान, योगा ट्रॅक, खुल्या व्यायामशाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान, लहान मुलांसाठी उद्यान, सायकल मार्गिका आणि जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृही इत्यादी सुविधा असतील.
प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे-वरळी सागरी सेतूचे वरळी टोक या भागात 10.58 किमी लांबीचा सागरी किनारा मार्ग बांधण्यात आला आहे. नुकताच या मार्गाचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या मार्गाच्या दोन्ही बाजूंना 70 हेक्टर जागेवर हरित क्षेत्र विकसित करण्याचे नियोजन आहे. यासाठी महानगरपालिकेने आराखडा तयार केला असून 400 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हा खर्च केल्याने पालिकेच्या पैशांची बचत होणार आहे.
हरित क्षेत्र विकसित करण्यासाठी पालिकेने निविदा काढली होती. याला रिलायन्स, जिंदाल, रेमण्ड, वेदांता कंपनी, टोरेस ग्रुप, जेएसडब्ल्यू या कंपन्यांनी प्रतिसाद दिला. यातून रिलायन्स फाऊंडेशनची निवड करण्यात आली. त्यांना मंजुरीचे पत्रही पालिकेने दिले आहे.
किनारा मार्गालगत 7.5 किमी भागात विहार पथही उभारण्यात आला आहे. हा परिसर मरिन ड्राइव्हप्रमाणे विकसित करण्यात आला आहे. येथे चालण्यासाठी 20 मीटर रूंद मार्गिका उभारण्यात आली आहे. यातील मध्यभागी 5 हेक्टरच्या जमिनीवर टाटा सन्सकडून हिरवळीचे क्षेत्र तयार करण्यात आले आहे. तसेच 12 हेक्टरचा भाग पालिका विकसित करत आहे. येथेही पर्यटकांना चालणे, सायकल चालवणे, जॉगिंग इत्यादी गोष्टी करता येतील.