Mumbai Coast Guard Diesel Smuggling Case: मुंबईच्या किनाऱ्याजवळ समुद्रात डिझेलची अवैध तस्करी सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी भारतीय तटरक्षक दलाने ‘हरिद्वार कृपा’ ही मासेमारी बोट ताब्यात घेतली आहे. व्यापारी जहाजाजवळ संशयास्पद हालचाली करताना ही बोट आढळली. तटरक्षक दलाने केलेल्या कारवाईदरम्यान बोटीवरील कर्मचाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या किनाऱ्याजवळ समुद्रात गस्त घालत असताना तटरक्षक दलाला ‘हरिद्वार कृपा’ ही मासेमारी बोट एका व्यापारी जहाजाजवळ संशयास्पद हालचाली करताना दिसली. त्यानंतर तटरक्षक दलाने बोटीला थांबण्याचे वारंवार इशारे दिले. मात्र, या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून बोटीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तटरक्षक दलाने बोटीचा पाठलाग करून तिला ताब्यात घेतले.
बोटीच्या कॅप्टनची प्राथमिक चौकशी केली असता, कॅप्टनने सुमारे चार हजार लिटर डिझेल घेतल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती आहे. तटरक्षक दलाच्या पाठलागादरम्यान पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सुमारे ५०० लिटर डिझेल समुद्रात टाकण्यात आल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.
या कारवाईत बोटीमधून महत्त्वाची कागदपत्रे आणि सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपासासाठी बोट आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना मुंबई बंदरात आणण्यात आले आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौदल, राज्य गुप्तवार्ता विभाग आणि पोलीस यांच्याकडून संयुक्त तपास सुरू करण्यात आला आहे. समुद्रात डिझेल नेमके कुठून आणले जात होते, त्याचा वापर कुठे होणार होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास यंत्रणा करत आहेत.