मुंबई: मुंबई महानगरप्रदेशात शनिवार( दि.30)पासून सीएनजी दरात वाढ होऊन तो प्रतिकिलो 86 रुपये झाला आहे.या दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सी व ॲप-आधारित कॅबचालकांच्या व्यवसायावर आर्थिक भार वाढणार आहे.त्यामुळे राज्य सरकारने तातडीने रिक्षा व कॅबच्या भाडेदरांचा फेरआढावा घेऊन सुधारित दर निश्चित करावेत, अशी मागणी भारतीय गिग कामगार मंच सरकारकडे करीत आहे.
याबाबत मंच अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर म्हणाले, सीएनजी दरांमध्ये झालेली वाढ ही चालकांसाठी चिंतेची बाब आहे.इंधन खर्चाबरोबरच वाहन देखभाल, विमा, सुटे भाग, वाहन कर्जाचे हप्ते व इतर खर्चातही सातत्याने वाढ होत आहे.
मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीचा दर आता 86 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम रिक्षा,टॅक्सी आणि कॅबचालकांवर होत आहे.वाढत्या खर्चामुळे चालकांच्या दैनंदिन उत्पन्न घटत आहे.याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक असल्याचे क्षीरसागर म्हणाले.
राज्यसरकारने निश्चित केलेले भाडेदर आणि प्रत्यक्षात चालकांना मिळणारे उत्पन्न यामध्ये तफावत निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यामुळे वाढलेल्या सीएनजी दरांचा व इतर खर्चांचा सर्वंकष विचार करून रिक्षा व कॅबच्या भाडेदरांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.राज्य सरकारने निश्चित केलेले सुधारित भाडेदर ओला, उबर, रॅपिडो तसेच इतर सर्व ॲप-आधारित वाहतूक कंपन्यांकडूनही काटेकोरपणे लागू होतील यासाठी आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
सीएनजी 86 ते 95 रुपये किलो...
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सध्याच्या स्थितीत सीएनजीचे दर 86 रुपयांपासून ते 95 रुपये पर्यंत प्रतिकिलो पोहोचला आहे.मुंबईमध्ये 86, पुण्यात 94 रुपये 75 पैसे, नाशिक मध्ये 93 रुपये 65 पैसे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 91 रुपये 90 पैसे आणि नागपूरमध्ये 88 रुपये 90 पैसे प्रतिकिलो इतके दर झाले आहेत.