मुंबई : मुंबईकरांनो.. यंदा दिवाळीला उटणे खरेदी करू नका. मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक तोंडावर असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी पोहचण्यासाठी उटण्याचे पॉकेट हे प्रचाराचे उत्तम साधन आहे. त्यामुळे घरोघरी मोफत उटणे वाटपासाठी राजकीय पक्षांची आतापासूनच जय्यत तयारी सुरू झाली आहे. अनेकांनी उटणे पॉकेट तयार करण्याच्या ऑर्डरही दिल्या आहेत.
मुंबई महानगरपालिका विसर्जित झाल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मुंबईचा नगरसेवक बनण्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांची आतापासूनच धडपड पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या मतदारांशी कसा संपर्क साधता येईल याच्या आयडिया लढवत आहे. आणि निवडणुकीच्या तोंडावर दिवाळी येत असल्यामुळे गिफ्टच्याद्वारे मतदारांच्या घरोघरी पोहचणे शक्य होणार आहे.
दिवाळीला उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून उटण्याचे घरोघरी वाटप करण्यात येणार आहे. आपल्या पक्षाच्या नावासह पक्षाचे चिन्ह, वरिष्ठ नेत्यांचे फोटो व स्वतःचा फोटो, व दिवाळीच्या शुभेच्छा असा मजकूर असलेले उटण्याचे पॉकेट घरोघरी वाटले जाते. त्यामुळे इच्छुकाचा त्याच्या पक्षाचा व चिन्हाचा आपसूकच प्रचार होतो. त्यामुळे यंदा प्रत्येक पक्षाकडून उटण्याचे पॉकेट घरोघरी मिळणार असल्यामुळे मुंबईकरांना बाजारात जाऊन उटणे खरेदी करण्याची गरज भासणार नाही.
एका प्रभागात मतदारांची संख्या सरासरी ४५ हजार ते ५० हजार असते. तर घरांची संख्या सरासरी १० ते १५ हजार असते. त्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवार एक घर याप्रमाणे आपले उटण्याचे पॉकेट तयार करून आपल्या कार्यकर्त्यांमार्फत घरोघरी वाटतात. यावेळी मोठ्या प्रमाणात उटण्याची मागणी असून ऐनवेळी त्याचा दर वाढण्याची शक्यता असल्यामुळे असल्यामुळे आतापासूनच अनेक राजकीय पक्षांच्या माजी नगरसेवकांसह इच्छुकानी आपल्या ऑर्डर दिल्या आहेत.
अन्य गिफ्टचेही वाटप
मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता असलेल्या माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील मतदारांना अन्य गिफ्टचे वाटप करण्याचाही निर्णय घेतला आहे. यात दिवाळीच्या फराळासह पणत्या, २०२६ चे कॅलेंडर, छोटी मोठी काचेची भांडी व अन्य गिफ्ट वाटप करण्यात येणार आहे. याच्या ऑर्डरही क्रॉफर्ड मार्केट येथे देण्यात येत आहेत.