

मुंबई : कंत्राटदारांवर करोडो रुपयाची उधळपट्टी करण्यामध्ये मुंबई महापालिकेचा कोणी हात धरू शकत नाही. आता गोवंडीच्या एम-पूर्व विभागात तीन गतिरोधक व सावधतेचे फलक बसवण्यासाठी कंत्राटदाराला २ लाख १० हजार ७३७ रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदारांना अक्षरश: पोसले आहे. अनेक कंत्राटदार पूर्वी रेल्वेने प्रवास करत होते. आज त्यांच्याकडे अलिशान गाडी व घर आहे. कंत्राटदारांसोबत महापालिकेचे काही अधिकारी व कर्मचारीही पैसेवाले बनले आहेत. अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी केल्यास करोड रुपये मालमत्ता आढळून येईल. यावरून अनेकदा आरोप प्रत्यारोप झालेले असताना, महापालिकेची कंत्राटदारांवर उधळपट्टी सुरूच आहे.
नागरिक व राजकीय पक्षांच्या मागणीनुसार गोवंडी एम पूर्व विभागातील बीट क्रमांक १४१ मध्ये देवनार म्युनिसिपल कॉलनीमधील अवामी गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पीएमजीपी कॉलनी, बीट क्रमांक २२,२३,२४,२५,२६, बीट १४२ व बीट क्रमांक १३९ मध्ये सरस्वती स्कूल पी.एल. लोखंडे मार्ग या तीन ठिकाणी गतिरोधक व सावधानतेचे फलक बसवण्यात येणार आहेत.
या फलकाचा खर्च एक लाख पण नसताना, कंत्राटदाराला २ लाख १० हजार रुपये देण्यात येणार आहे. एवढ्या छोट्या रकमेतही कंत्राटदारायची मोठी कमाई होणार आहे. अशाप्रकारे १० लाख रुपयांची लहान कंत्राटी घेणारे कंत्राटदार महापालिकेमध्ये १०० ते १२० च्या घरात आहेत. १५ दिवसात हे गतिरोधक बसवण्याचे मुदत देण्यात आली असून याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.