मुंबई : मुंबईच्या सुरक्षेसाठी शहरभर उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणांच्या विश्वासार्हतेवर आता सायबर सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘मेड इन इंडिया’ म्हणून विकल्या जाणाऱ्या काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चिनी बनावटीचे हार्डवेअर, चिपसेट आणि तंत्रज्ञान वापरले जात असल्याने संवेदनशील माहिती परदेशात पोहोचण्याचा धोका असल्याची चिंता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
सायबर मल्टी एजन्सी सेंटरच्या (CyMAC) ऑनलाईन बैठकीतही हा मुद्दा उपस्थित झाल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सीसीटीव्ही यंत्रणांचे केवळ कार्यक्षमतेच्या दृष्टीने नव्हे, तर तांत्रिक आणि सायबर सुरक्षेच्या दृष्टीनेही ऑडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात १२ हजारांहून अधिक कॅमेऱ्यांचे थेट फीड उपलब्ध असल्याने या यंत्रणांची सुरक्षितता महत्त्वाची ठरणार आहे.
गुप्तचर यंत्रणांचा संभाव्य धोक्याचा इशारा
सायबर मल्टी एजन्सी सेंटरच्या बैठकीत एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील संभाव्य सुरक्षाविषयक त्रुटींकडे विविध सुरक्षा यंत्रणांचे लक्ष वेधले. इंटरनेटशी जोडलेल्या काही कॅमेऱ्यांमधील चित्रण, उपकरणांची माहिती आणि संवेदनशील तपशील परदेशातील सर्व्हरपर्यंत पोहोचण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली. काही भारतीय ब्रँडच्या कॅमेऱ्यांमध्ये चिनी बनावटीचे प्रोसेसर, सॉफ्टवेअर किंवा फर्मवेअर वापरले जात असल्याचा संशय आहे.
परदेशातून सुटे भाग मागवून भारतात कॅमेऱ्यांची जुळणी केली जात असल्यास केवळ भारतीय कंपनीचे नाव किंवा ‘मेड इन इंडिया’चा शिक्का पाहून त्यांचे तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी असल्याचे मानता येणार नाही. त्यामुळे कॅमेऱ्यांमधील प्रत्येक महत्त्वाच्या घटकाची तपासणी करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मुंबईच्या सुरक्षेसाठी ऑडिट महत्त्वाचे
मुंबईत रेल्वे स्थानके, विमानतळ, मेट्रो, बंदरे, सरकारी कार्यालये, पोलीस ठाणी आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गुन्हेगारांचा माग काढणे, संशयितांची ओळख पटविणे, वाहतूक नियंत्रण आणि दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी या यंत्रणेचा वापर होतो.
मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या व्हिडीओ वॉलवर मुंबई पोलिसांनी बसविलेल्या १२ हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट फीड उपलब्ध आहे. मात्र, यापैकी किती कॅमेरे प्रत्यक्ष कार्यरत आहेत, किती नादुरुस्त आहेत आणि किती कॅमेऱ्यांमध्ये निर्धारित सायबर सुरक्षा मानकांचे पालन झाले आहे, याची अद्ययावत एकत्रित आकडेवारी उपलब्ध नाही.
केंद्र सरकारचे सुरक्षा नियम
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी सुरक्षा मानके निश्चित केली आहेत. ९ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या नियमांनुसार कॅमेऱ्यांचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, फर्मवेअर आणि महत्त्वाच्या सुट्या भागांच्या पुरवठा साखळीची तपासणी आवश्यक आहे. मानकीकरण परीक्षण व गुणवत्ता प्रमाणन संचालनालयाकडून (STQC) या कॅमेऱ्यांची चाचणी आणि प्रमाणन केले जाते.
१ एप्रिल २०२६ पासून निर्धारित सुरक्षा निकषांची पूर्तता न करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीवर निर्बंध लागू झाले आहेत. मात्र, यापूर्वी बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांची सुरक्षा तपासणेही आवश्यक आहे. त्यामुळे जुन्या यंत्रणांचे स्वतंत्र ऑडिट महत्त्वाचे ठरणार आहे.