मुंबई : गावदेवी पोलिसांनी जेरबंद केलेले मोबाईल चोरटे. pudhari photo
मुंबई

Munbai Crime : मोबाईल चोरट्यांची टोळी गावदेवी पोलिसांकडून जेरबंद

सात आरोपींना अटक : १६ लाखांचे ४२ मोबाईल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कंबाला हिल बसथांबा ते पेडर रोडदरम्यान बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला गर्दीचा फायदा घेत धक्का देऊन मोबाईल लंपास करणाऱ्या टोळीचा गावदेवी पोलिसांनी छडा लावला. पोलिसांनी यासंदर्भात ७ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे ४२ चोरीच्या मोबाईलसह १६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत गावदेवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार बसमधून प्रवास करत असताना अनोळखी व्यक्तींनी गर्दीत धक्का देत त्यांचा वनप्लस कंपनीचा मोबाईल चोरला होता.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यातून मोबाईल चोरी करणाऱ्या संघटित टोळीचा माग काढण्यात आला. पोलिसांनी मानखुर्द व शिवाजीनगर परिसरातून सहा आरोपींना, तर टोळीच्या सूत्रधाराला राजस्थानातून अटक केली.

अटक केलेल्या आरोपींमध्ये अफताब आबाद अन्सारी (वय २६), हसन अब्बास शेख (वय ३५), चाँद मोहम्मद मोहम्मद सुलतान (वय ५३), इम्तीयाज इमामअली शेख (वय ४६), आजम आक्रम कुरेशी (वय ३२), स्वप्निल शंकर सोनावणे (वय २९) व रजब अली मोहमद तकी शेख ऊर्फ चिकणा (वय ३२) यांचा समावेश आहे. या टोळीने आणखी किती ठिकाणी मोबाईल चोरी केली आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पोलीस उपायुक्त (दक्षिण परिमंडळ-२) रागसुधा आर. व सहाय्यक पोलीस आयुक्त (गावदेवी विभाग) सुमन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत मोहिते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजीव पाटील तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT