मुंबई: प्रोटेक्शन मनीच्या बहाण्याने एका बांधकाम व्यावसायिकाला २५ लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी १२ जणांच्या एका टोळीला वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली.
मोहसीन यासीन बेहलीम, जुल्फीकार यासिन बेहलीम, अजय रविंद्र यादव, अन्वर अहमद फारुखी, मोहम्मद आसिफ मोईनुद्दीन खान, मोहम्मद कलीम मोहम्मद रौफ सय्यद, रियाज सादिकअली शेख, आदिल नाजीर कुरेशी, रितेशकुमार फुलेंद्र राम, बिलाल अहमद सय्यद, नौशाद अहमद नासीर अहमद सलमानी आणि मोहम्मद सिकंदर तन्वर अशी या बाराजणांची नावे आहेत.
या सर्वांना किल्ला न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीचे मोहसीन व जुल्फीकार म्होरके असून इतर आरोपी त्यांच्यासाठी काम करतात. त्यांच्या अटकेने खंडणीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यातील तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत घाटकोपर परिसरात राहतात. विलेपार्ले येथील एका खासगी कंपनीसोबत त्यांचा एक करार झाला होता. त्यांच्या कंपनीला म्हाडाकडून चार कोटीचे एक कंत्राट मिळाले होते. त्यासाठी मोहम्मद सिंकदरनेही अर्ज केला होता.
मात्र त्याच्या कंपनीला ते काम मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी तक्रारदारांना त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून संंबंधित कंत्राट पूर्ण करण्यास सांगितले. त्यांनी तसे केले नाही तर त्याला त्यांना २५ लाख रुपये द्यावे लागतील. त्याने तो मोहसीन व जुल्फीकार बेहलीमसाठी काम करत असून त्यांच्याच सांगण्यावरुन त्याने कॉन्ट्रक्ट मिळविण्यासाठी अर्ज केला होता.
ते दोघेही नामचीन गुंड असून त्यांना प्रोटेक्शन मनी म्हणून २५ लाख रुपये दिले नाहीत तर त्यांचा गेम करण्याची धमकी दिली होती. यावर तक्रारदारांनी गुन्हे शाखेला ही माहिती सांगून संबंधितांविरुद्ध तक्रार केली. याप्रकरणी खंडणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला.
दोन दिवसांपूर्वी मोहम्मद सिंकदरने त्यांना कॉल करुन खंडणीची रक्कम घेऊन वांद्रे येथील ताज हॉटेलजवळ बोलवले होते. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, एपीआय महेंद्र पाटील, जयदीप जाधव, मोहन जगदाळे,
विजय धोत्रे, श्रीराम घोडके, उपनिरीक्षक कल्याण पाटील, ऋषिकेश बाबर, सुजीत म्हैसधुणे, सहाय्यक फौजदार म्हाळसंक, भोसले, वैद्य, गवळी, पोलीस अंमलदार परब, राहुल पवार, भिंगारदेवे, पाटील, सोनावणे, कदम, बच्छाव, गडहिरे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली.
सोमवारी तिथे खंडणीची रक्कम घेण्यासाठी मोहसीन व जुल्फीकार हे दोघेही त्यांच्या इतर दहा सहकार्यांसोबत आले. यावेळी त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी खंडणी म्हणून स्विकारलेली कॅश, बारा मोबाईल व बारा सिमकार्ड जप्त केले.
तपासात यातील मोहसीन आणि जुल्फीकार हे दोघेही सख्खे बंधू असून त्यांनीच स्वत:ची एक टोळी बनवली होती. इतर सहकार्यांच्या मदतीने त्यांनी तक्रारदारांना खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले.
त्यांच्याविरुद्ध यापूर्वी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यात ते जामिनावर बाहेर आले होते. जामिनावर बाहेर आल्यावर त्यांनी पश्चिम उपनगरातील काही व्यावसायिकांना खंडणीसाठी टार्गेट करण्यास सुरुवात केली होती.