BMC Vaidya AI Pudhari
मुंबई

BMC Vaidya AI: मुंबईकरांच्या सेवेत ‘वैद्य एआय’! व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार जवळच्या रुग्णालयांची माहिती

उपचार, आरोग्य योजना आणि अभिप्रायाची सुविधाही

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महापालिकेने फ्रॅक्टल अ‍ॅनॅलिटिक्स लिमिटेडच्या सहकार्याने ‘वैद्य एआय’ (Vaidya AI) या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटची सुविधा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस शुक्रवारपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल केली. ९८९२९९३३६८ या क्रमांकावर संवाद साधला की वैद्य एआय हजर!

घराजवळील रुग्णालय कोणते, कोणत्या आरोग्य सुविधा तिथे उपलब्ध आहेत, केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ त्या ठिकाणी कसा घेता येईल याची माहिती आता मुंबईकरांना थेट व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आहे.

महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील विविध सेवा एकमेकांशी जोडण्यात आल्या आहेत. आरोग्य पायाभूत सुविधांची माहितीही या प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे वैद्य एआय भाषेसाठी अडत नाहीत.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मुंबईकरांशी वेगवेगळ्या भाषेत ते संवाद साधतील. थोडक्यात हे बहुभाषिक वैद्य एआय आहेत.

केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहितीही चॅटबॉटवर उपलब्ध असून, मुंबईकरांना आरोग्य सेवांबाबत आपला अभिप्राय नोंदविण्याची सुविधाही त्यात देण्यात आली आहे.

तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर

महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे दैनंदिन कामकाज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने ‘वैद्य एआय’ हे समर्पित व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. पुढील तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे तसेच फ्रॅक्टल अ‍ॅनॅलिटिक्स लिमिटेडच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या उपक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT