मुंबई : मुंबई महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आले असून एकत्रित गट स्थापन केला आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांचे नेतृत्व शिवसेना करणार असून गटनेते पदी अमेय घोले राहणार आहेत. तीनही पक्ष एकत्रित आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेची ताकद आता वाढणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक नगरसेवक निवडून आला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी स्वतंत्र निवडणूक लढवल्यामुळे त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ज्येष्ठ नगरसेविका डॉ. सईदा खान यांना गटनेते करण्यात येणार होते. शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी स्वतंत्र राहणार असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले होते. परंतु मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीमध्ये भाजपा-शिवसेना महायुती व विरोधकांचे समसमान सदस्य झाल्यामुळे अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार हे चिठ्ठी ठरवणार होती. सत्ता असूनही महायुतीला अध्यक्षपद गमवावे लागले असते.
महापालिकेत महायुतीची ताकद वाढवण्यासाठी भाजप-शिवसेना एकत्रित गट स्थापन करण्याचाही विचार झाला होता. परंतु शिवसेनेने त्याला विरोध केला. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्रित घेऊन गट स्थापन करण्यासाठी तयारी सुरू केली. अखेर तिन्ही पक्ष एकत्रित आले असून महापालिकेत एक गट स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या गटातील नगरसेवकांची संख्या आता 33 झाली आहे. तर या तिन्ही पक्षांचा गटनेता हा एकच राहणार आहे.
शिवसेनेला 2 स्वीकृत नगरसेवक मिळणार
शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आल्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवक पदे आली आहेत. त्यामुळे शिवसेनेला दोन अभ्यासू नगरसेवकांना महापालिकेत प्रवेश देता येणार आहे. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांची संख्या 35 होणार आहे. सुधार समितीसह अन्य समित्यांमधील माहितीच्या सदस्यांची संख्याही एकने वाढणार आहे.
20 फेब्रुवारीला स्थायी व शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक
महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बुधवार 11 फेब्रुवारीला पार पडल्यानंतर 20 फेब्रुवारीला स्थायी व शिक्षण समिती अध्यक्ष पदाची निवडणूक होणार असून 23 फेब्रुवारीला सुधार व बेस्ट समिती अध्यक्ष पदाची निवडणूक होईल. यासाठी बुधवार 18 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. या निवडणुकीतही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस माघार घेणार का याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवार 24 फेब्रुवारीला महापालिकेची सभा होईल. या सभेत कोणतेही कामकाज न करता, श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात येणार आहे. दरम्यान प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक 5, 6 व 9 मार्चला होणार असून विशेष समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका 12, 13 व 16 मार्चमध्ये घेण्यात येणार आहेत.