मुंबई: मुंबई शहर व उपनगरांतील लसीकरण व नसबंदी झालेल्या भटक्या कुत्र्यांच्या गळ्यामध्ये क्यूआर कोड असलेले विशिष्ट प्रकारचे पट्टे बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात कांदिवली आर-दक्षिण विभागात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या क्यूआर कोडमध्ये कुत्र्यांच्या संदर्भातील नोंद केली जात असल्यामुळे त्यांची संपूर्ण माहिती मुंबई महापालिकेला सहज उपलब्ध होणार आहे. २०३० पर्यंत मुंबईला रेबीजमुक्त करण्यासाठी हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कुत्र्यांच्या गळ्यात बांधण्यात येणाऱ्या पट्ट्याच्या क्यूआरकोडवर स्कॅन केल्यानंतर संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.
महापालिकेने कुत्र्यांच्या लसीकरणावर भर दिला आहे. त्याशिवाय त्यांची संख्या कमी करण्यासाठी नसबंदीचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे. लसीकरण झालेल्या कुत्र्यांना ओळखता यावे, यासाठी महापालिकेमध्ये रंगीत शाई किंवा अन्य खुणा केल्या जात होत्या. रंगाच्या खुणा कालांतराने फिक्कट पडत असल्यामुळे कुत्र्यांना ओळखणे शक्य होत नव्हते. यासाठी आता क्यूआर कोड ही अत्याधुनिक पद्धत अमलात आणण्यात आली आहे.