Mumbai parking app pudhari photo
मुंबई

Mumbai parking app : घरबसल्या पार्किंग आरक्षित करता येणार !

नवीन पार्किंग ॲप्लिकेशन प्रकल्पाचा लवकरच होणार शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कामानिमित्त मुंबईत जायचे आहे. आता आपली गाडी कुठे पार्क करावी, याचे टेन्शन राहणार नाही. महापालिकेने पार्किंग ॲप्लीकेशन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांसह अन्य शहरातून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आपली गाडी पार्क करण्यासाठी घरबसल्या पार्किंग आरक्षित करता येणार आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ येत्या महिन्याभरात करण्यात येणार आहे.

मुंबईत कामानिमित्त यायचे झाले तर, पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. विशेषत: दक्षिण मुंबईत पार्किंग उपलब्ध होत नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे अनेकदा वाहतूक पोलिसांकडून अशा गाड्यांवर कारवाई करण्यात येते. यात वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने स्मार्ट पार्किंग प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रकल्पाचा अभ्यास सुरू असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबई महापालिका मोबाईल पार्किंग ॲप्लीकेशन विकसित करणार आहे. या ॲप्लीकेशनद्वारे मुंबईकरांना घरबसल्या आपले पार्किंग आरक्षित करता येणार आहे. त्यामुळे मुंबईत आल्यानंतर पार्किंग शोधण्याची वाहन चालकांना गरज भासणार नसल्याचे पालिकेच्या वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीतून राबवण्यात येणार आहे. यासाठी लवकरच अर्ज मागविण्यात येणार आहेत. या योजनेतून मुंबई महानगरपालिकेवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. सार्वजनिक खाजगी भागीदारीतून पार्किंग दिल्यानंतर यातून महापालिकेलाही काही उत्पन्न मिळणार आहे.

नेमकी किती टक्केवारी महापालिकेला मिळेल याचा सध्या अभ्यास सुरू आहे. सुरुवातीला या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी 530 पार्किंग टप्प्याटप्प्याने उपलब्ध केली जाणार आहेत. हे पार्किंग क्षेत्र खासगी कंपनीला दिल्यानंतर त्यांनी ॲप्लीकेशनद्वारे वाहनांना पार्किंगची जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

पार्किंगचा दर पालिका ठरवणार

खासगी भागीदारीतून पार्किंग चालवण्यात येणार असल्या तरी वाहनांसाठी आकारण्यात येणारा पार्किंगचा दर मुंबई महानगरपालिका व खासगी संस्था एकत्रितरित्या ठरवणार आहे. पार्किंगमधून मुंबईकरांची लूट होणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पार्किंगला किती पैसे आकारावे याचा अभ्यास करणार

ऑनलाइन पार्किंग आरक्षित करणाऱ्यांना किती पैसे आकारावे व किती वेळात त्यांनी आपले वाहन पार्क केले पाहिजे, याबाबतचा अभ्यास करण्यात येणार आहे. एकदा वाहनासाठी पार्किंग आरक्षित केल्यानंतर त्या वाहन चालकांकडून ऑनलाईन पेमेंट घेण्यात येणार आहे. एकदा पेमेंट घेतल्यानंतर त्या वाहन चालकाने आपली गाडी दिलेल्या पार्किंगमध्ये पार्क न केल्यास त्याला पैसे परत मिळणार नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT