मुंबई : महापालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालयातील अपुऱ्या पडणाऱ्या सभागृहाला पर्याय म्हणून उभारण्यात येणाऱ्या नव्या सभागृहाच्या प्रस्तावावर अखेर स्थायी समितीत मंजुरी मिळाली आहे. आझाद मैदानाशेजारी टाऊनहॉल जिमखाना ही सहा मजली इमारत उभारण्यात येणार असून, त्यामध्ये ३२९ ते ३५० नगरसेवकांच्या बैठकीची व्यवस्था विधान भवन सारखी असेल. सुमारे ४५ कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थायी समितीने गुरुवारी सर्वानुमते मंजुरी दिली. येत्या दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
मुंबई महापालिकेचे सध्याचे ऐतिहासिक सभागृह १८९३ मध्ये उभारण्यात आले होते. त्यावेळी नगरसेवकांची संख्या कमी असल्याने हे सभागृह पुरेसे होते. मात्र, कालांतराने नगरसेवकांची संख्या वाढल्याने सभागृहातील जागा अपुरी पडू लागली. सध्या २२७ नगरसेवक असून, पत्रकार, सचिव विभागातील अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे बैठक व्यवस्थेवर मर्यादा येत आहेत. त्यामुळे नवीन सभागृह उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्याने नव्या सभागृहाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मात्र, प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान सदस्यांनी प्रशासनाला विविध मुद्द्यांवर धारेवर धरले. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी प्रस्तावाचे पीपीपी सादरीकरणाची प्रत इंग्रजीत दिल्याबद्दल आक्षेप घेतला. मुंबई महापालिकेला मराठी भाषेचे वावडे आहे का, असा सवाल करत महत्त्वाचे प्रत मराठीत सादर करण्याची मागणी त्यांनी केली.
शिवसेना नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी कामाच्या निविदा १३ टक्के कमी दराने काढल्या असून कुठे काटकसर करणार,का आणि कामाचा दर्जा याबाबत विचारणा केली. तसेच मराठी प्रत का दिली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. शिवसेना नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी संबंधित कंत्राटदार कंपनीने महापालिकेकडे नोंदणीसाठी अर्ज केला आहे का, टेंडर नियमांच्या निकषांत हे बसते का, याची विचारणा केली.
एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी निविदा प्रक्रिया, जागेचे क्षेत्रफळ आणि प्रकल्पाच्या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केले. सुरुवातीला ४ हजार ७१९ चौरस मीटर असलेले प्रस्तावित क्षेत्रफळ आता ५ हजार २५१ चौरस मीटरपर्यंत गेले आहे. म्हणजे क्षेत्रफळ २६ टक्क्यांनी कसे वाढले, असा सवाल त्यांनी केला. भविष्यात प्रकल्पाचा खर्च वाढणार का, याचे स्पष्टीकरणही प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत, सुरक्षारक्षकांची संख्या आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत माहिती मागितली.
जुन्या आणि नव्या इमारतीदरम्यान ये-जा करण्यासाठी विशेष जोडमार्ग उभारण्यात येणार आहे का, अशी विचारणा केली. नव्या सभागृहाचा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचा दावा सभागृह नेते गणेश खणकर यांनी केला. सौरऊर्जा पॅनेलही बसविण्यात येणार आहेत. त्यातून ७० टक्के विजेची गरज भागली जाईल. रेनवॉटर हार्वेस्टिंगही केले जाणार आहे. हा प्रकल्प मुंबईसाठी आदर्श ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.
इमारतीत काय असणार?
नवे सभागृह विविध सोयीसुविधांनी परिपूर्ण असणार आहे. तळघरात पार्किंग, तळमजल्यावर गॅलरी हॉल आणि प्रवेशद्वाराची लॉबी असेल.
पहिल्या पोडियमवर पार्किंग, तर दुसऱ्या पोडियमवर बॅडमिंटन कोर्ट आणि पार्किंगची व्यवस्था असेल.
तिसऱ्या मजल्यावर व्यायामशाळा आणि इनडोअर गेम्स.
चौथ्या मजल्यावर स्वागतकक्ष, प्रतीक्षागृह, परिषद कक्ष, कार्यालय, भोजनकक्ष आणि कॅफेटेरिया असेल.
पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर सभागृह व ऑडिटोरियम उभारण्यात येणार आहे.
अपुऱ्या पार्किंगवर चिंता
नव्या इमारतीतील पार्किंगच्या व्यवस्थेवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी चिंता व्यक्त केली. ७० ते ८० वाहनांसाठीच पार्किंगची सुविधा प्रस्तावित असल्याने नगरसेवकांची संख्या लक्षात घेता वाहनतळ अपुरे पडण्याची शक्यता व्यक्त केली. यावर बोलताना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी पार्किंगच्या विषयावर चर्चा करून मार्ग काढू. शासन आणि तज्ज्ञांची मदत घेऊ, असे प्रभाकर शिंदे यांनी यावेळी सांगितले.