मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे डॉक्टरांनी काम केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालय आणि वांद्रे येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात कथित बोगस डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, भारत सावंत या कथित बोगस डॉक्टरने एकापेक्षा अधिक रुग्णालयांत काम केल्याचा दावा असून, त्याने मिरा रोड येथील मॅक्स रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञ म्हणून काम केल्याचे दर्शविणारा कथित दस्तऐवजही समोर आल्याची माहिती आहे.
जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निरंजन यांनी भारत सावंत हा बनावट डॉक्टर असल्याचे मान्य केल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. सावंत याने रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात काम केले होते. त्याच्या नियुक्ती प्रक्रियेत तत्कालीन दोन डॉक्टरांचा सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी महापालिकेच्या मुख्य चौकशी अधिकाऱ्यांकडे काही महिन्यांपूर्वी मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप चौकशी पूर्ण झालेली नसल्याचा दावा आहे.
याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने पत्रव्यवहार केल्याचे सांगण्यात येते. मात्र, संबंधित पोलिसांकडूनही कारवाईला विलंब होत असल्याचा आरोप आहे. मानवाधिकार आयोगाने १ एप्रिल २०२६ रोजी पोलिसांकडे या प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई केली, याबाबत उत्तर मागितले होते. मात्र, त्यालाही प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
दरम्यान, जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात आणखी एका कथित बोगस डॉक्टराने काम केल्याची माहिती समोर आली आहे. वाय. एस. एन. चंद्रशेखर याने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे (एमएमसी) बनावट प्रमाणपत्र वापरून रुग्णालयात काम केल्याचा आरोप आहे.
तसेच व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भारत सावंत याच्यासह वाय. एस. एन. चंद्रशेखर, राहुल यादव आणि काजोल शिंदे या चार जणांनी कथितरीत्या काम केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रतेची आणि वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्रांची पडताळणी नेमकी कशी करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये नियुक्त होणाऱ्या डॉक्टरांच्या वैद्यकीय पदव्या, नोंदणी प्रमाणपत्रे आणि अनुभवाची काटेकोर पडताळणी होणे अपेक्षित आहे. मात्र, बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात काम केल्याचे आरोप खरे ठरल्यास रुग्णांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून संबंधित डॉक्टरांची नियुक्ती, प्रमाणपत्रांची सत्यता आणि जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्याची मागणी होत आहे.