BMC pudhari photo
मुंबई

BMC Hospital Complaints : मुंबई महापालिका रुग्णालयांत तब्बल २८८ तक्रारी प्रलंबित!

केईएम, कूपर, सायनमधील ५६५ तक्रारींपैकी केवळ दोनच मुदतीत निकाली

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सेवांबाबत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात असताना, या तक्रारींच्या निवारणाची प्रक्रिया मात्र संथ असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्राप्त झालेल्या ५६५ तक्रारींपैकी २८८ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे, या प्रलंबित तक्रारींपैकी २२६ तक्रारींची निर्धारित मुदत उलटून गेल्याने त्या वरिष्ठ स्तरावर वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तक्रारींचे निवारण नेमके कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रुग्णालयांबाबत प्रामुख्याने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक मिळणे, रुग्णालयातील अस्वच्छता, स्वच्छतागृहांची दुरवस्था, डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसणे किंवा ड्युटीवर अनुपस्थित राहणे, तसेच आवश्यक औषधांचा तुटवडा यांसारख्या तक्रारी केल्या जातात. औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागतात. मात्र, उपलब्ध आकडेवारीत तक्रारींचे विषयानुसार वर्गीकरण करण्यात आलेले नाही.

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमधील स्थिती अधिक गंभीर आहे. या रुग्णालयांशी संबंधित ११० तक्रारींपैकी तब्बल ७३ तक्रारी प्रलंबित आहेत. म्हणजेच ६६.४ टक्के तक्रारींचा निपटारा झालेला नाही. केईएम रुग्णालयातील ३० तक्रारींपैकी २९, कूपर रुग्णालयातील ५१ पैकी २१, तर लोकमान्य टिळक रुग्णालयातील सर्व १६ तक्रारी प्रलंबित आहेत. नायर रुग्णालयातील सातपैकी एक तक्रार प्रलंबित आहे.

उपनगरीय रुग्णालयांची स्थिती तुलनेने चांगली असली, तरी येथेही ११४ तक्रारींपैकी १८ तक्रारी प्रलंबित आहेत. राजावाडी रुग्णालयातील १६ पैकी तीन, एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालयातील १२ पैकी सहा, तर कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील १३ पैकी दोन तक्रारी प्रलंबित आहेत. विशेष रुग्णालयांमध्ये १६ तक्रारींपैकी १४ निकाली काढण्यात आल्या असून दोन प्रलंबित आहेत.

१७५ तक्रारी अवैध ठरविल्या

  1. दरम्यान, आरोग्य विभागाकडे प्राप्त झालेल्या ५६५ तक्रारींपैकी २२९ तक्रारी बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यापैकी केवळ दोन तक्रारींचे निर्धारित मुदतीत निवारण झाले आहे.

  2. ५२ तक्रारींचे वरिष्ठ स्तरावर वर्गीकरण झाल्यानंतर निवारण करण्यात आले, तर १७५ तक्रारी अवैध ठरविण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, २८८ तक्रारी अद्याप प्रलंबित असून त्यापैकी ६२ तक्रारींच्या निवारणाची मुदत बाकी आहे.

  3. उर्वरित २२६ तक्रारींची मुदत संपली आहे. रुग्णालयांतील सेवांबाबत तक्रारी करूनही त्यांचे वेळेत निराकरण होत नसेल, तर तक्रार निवारण यंत्रणेचा उपयोग काय, असा सवाल या आकडेवारीमुळे उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT