BMC pudhari photo
मुंबई

Mumbai BMC Fixed Deposits: मुंबई महापालिकेच्या ठेवी ११ हजार कोटींनी घटल्या, भाजपची सत्ता येताच तिजोरीला गळती; काॅंग्रेसचा आरोप

२०२१ मधील ९१,६९० कोटींच्या ठेवी ऑक्टोबर २०२६ मध्ये ७९,८७३ कोटींवर; अश्रफ आझमी यांची श्वेतपत्रिकेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या मुदतठेवींना भाजपची सत्ता आल्यापासून गळती लागली आहे. २०२१ साली ९१६९० कोटी रुपये असलेल्या मुदतठेवी ऑक्टोबर २०२६ मध्ये ७९८७३ कोटी झाल्या आहेत. म्हणजेच मुदतठेवींमध्ये ११८१७ कोटींची घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षात त्यात आणखी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालिकेच्या विविध विभागांच्या शिल्लक रकमेच्या मुदतठेवी विविध बँकांमध्ये असतात. विविध बँकांचे व्याजदर मागवून सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये या ठेवी गुंतवल्या आहेत. त्या मुदतठेवींवरून पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येत असतो.

पालिकेच्या या मुदत ठेवीमधूनच आस्थापना खर्च व निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी दिली जात असतात. तसेच विविध विकासकामांसाठी कंत्राटदारांकडून घेतलेल्या अनामत रकमांचा या ठेवीमध्ये समावेश असतो.

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मुदतठेवींचा लेखाजोखा प्रशासनाने स्थायी समितीपुढे मांडला आहे. त्यात मे महिन्याअखेरपर्यंत ठेवी दोन हजार कोटींंनी वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुुुळे ठेवी नेमक्या किती आहेत, त्यात किती घट झाली, ती कोणत्या कारणाने झाली, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

२०२१ मध्ये ९१,६९० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. अलीकडच्या काळात त्यातून आठ हजार कोटी रुपये काढण्यात आले होते. त्यावरूनही मोठा वादंग झाला होता. नुकत्याच सादर झालेल्या अहवालानुसार, १ मे २०२६ रोजी मुदतठेवी सुमारे ७७,३१० कोटी होत्या. मे महिन्यात सुमारे ८,८४० कोटींची नवी गुंतवणूक करण्यात आली. त्याच काळात सुमारे ६,८४० कोटींच्या ठेवी परिपक्व झाल्या. नवी गुंतवणूक आणि परिपक्व ठेवी यांचा हिशेब केल्यावर निव्वळ वाढ सुमारे १,९९४ कोटी झाली. यामुळे ३१ मे २०२६ रोजी एकूण मुदतठेवी सुमारे ७९,३०४ कोटी झाल्या.

मात्र आता २०२१ ते २०२६ या कालावधीत मिळणारे व्याज लक्षात घेता ठेवींमध्ये ३० हजार कोटींची वाढ होऊन एकूण ठेवी सुमारे १०० कोटींच्या घरात असायला हव्यात, मग फक्त ७९ हजार ३०४ कोटी रकमेच्याच ठेवी का दिसत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

२०२१ मध्ये महापालिकेची एफडी एकूण ९१,६९० कोटी रुपये होती. ऑक्टोबर २०२६ मध्ये ती ७९,८७३ कोटी रुपये राहिली आहे. म्हणजे ११,८१७ कोटी रुपयांनी कमी झाली आहे आणि मार्च २०२६ मध्ये तर ती ७७,९०५ कोटी रुपयेपर्यंत खाली गेली होती, म्हणजे १३,७८५ कोटी रुपयांनी कमी झाली होती.

मुदत ठेवींच्या व्याजापोटी मिळालेले ३० हजार कोटी गेले कुठे, असा प्रश्न करतानाच काँग्रेस गटनेते अश्रफ आझमी यांनी मुदत ठेवींच्या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुदत ठेवीतून किती पैसे काढले, ते कोणत्या कामात खर्च झाले, २.४४ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी ठेवीनाच हात घालणार का, असा सवाल त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT