मुंबई : राजन शेलार
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होत चालली आहेत. मुंबईत भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच ठाकरे बंधूंनी आपली युती जाहीर करून निवडणुकीत रंगत आणली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसपाठोपाठ आम आदमी पार्टीने (आप) मुंबईत 227 जागा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली-पंजाबमध्ये सत्ता मिळवलेल्या ‘आप’च्या एन्ट्रीचा ‘ताप’ मुंबईत मतांच्या होणाऱ्या विभागणीमुळे सत्ताधाऱ्यांच्या की विरोधकांच्या डोक्याला ठरणार, यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून, ती राज्यातील राजकीय ताकदीचे प्रतिबिंब मानली जाते. अशावेळी आम आदमी पार्टीचा मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील प्रवेश अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतो. मात्र, दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता मिळविलेला ‘आप’ पक्ष मुंबईत कितपत प्रभाव टाकू शकतो, हा एक चर्चेचा विषय ठरू शकतो. पण, मुंबईसारख्या महानगरात, जिथे शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस यासारख्या पक्षांची खोलवर मुळे रुजलेली असताना तिथे ‘आप’साठी स्वतंत्र राजकीय जागा निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीतही ‘आप’ने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. यामध्ये सर्व जातीय व धार्मिक गटांना प्रतिनिधित्व दिले गेले आहे.
मतांचे समीकरण बदलण्यात निर्णायक भूमिका
‘आप’ची स्वतंत्र लढत म्हणजे केवळ जागा जिंकण्याचा प्रयत्न नसून, मुंबईतील पारंपरिक राजकीय ध्रुवीकरणाला छेद देणारा तसेच भविष्यातील युती-आघाड्यांच्या समीकरणांवर परिणाम करणारा प्रयोग ठरू शकतो. मतांचे विभाजन वाढून परिणामी अनेक प्रभागांमध्ये तिरंगी अथवा चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे. ‘आप’ला मोठे यश मिळाले नाही, तरीही मतांचे समीकरण बदलण्यात ती निर्णायक भूमिका बजावू शकते, हे मात्र नक्की.
‘दिल्ली मॉडेल’ प्रचाराचा प्रमुख मुद्दा
दिल्ली आणि पंजाबमधील अनुभव पुढे करत ‘आप’चा प्रचार हा भ्रष्टाचारविरोध, पारदर्शक कारभार आणि मूलभूत नागरी सुविधांभोवती फिरण्याची चिन्हे आहेत. महापालिकेतील कथित भ्रष्टाचार, ठेकेदारी, वाढते कर, पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य व शिक्षण, झोपडपट्टी पुनर्वसन, वाहतूक कोंडी, पर्यावरणाचा ऱ्हास या मुद्द्यांवर ‘आप’ आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. ‘दिल्ली मॉडेल’चा दाखला देत करदात्यांच्या पैशांचा योग्य वापर यासारखे प्रमुख मुद्दे प्रचारात घेत सामान्य मुंबईकराच्या प्रश्नांना थेट हात घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.