मुंबई : मुंबईत होऊ घातलेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापालिका सभागृहात महिलाराज बघायला मिळणार आहे. आरक्षणामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असून काही खुल्या प्रवर्गातही महिलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिला नगरसेविकांची संख्या वाढणार आहे.
प्रत्यक्ष प्रभागात उमेदवारी देताना त्या प्रभागात एखाद्या महिलेचे कार्य लोकाभिमुख असेल अशा महिलांना अगदी खुल्या प्रवर्गातील प्रभागातही उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त असते. मग ती कोणत्याही प्रवर्गातील असली तरी चालते. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महिलांची संख्या पुरुष नगरसेवकांपेक्षा जास्त असणार, हे निश्चित आहे.
प्रभागाचे आरक्षण करताना ओबीसीसाठी राखीव असलेल्या 61 प्रभागांतून 31 प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. एवढेच काय तर अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या 15 प्रभागांपैकी 8 प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या दोन प्रभागांतून एक प्रभाग महिलेसाठी आरक्षित करण्यात आला आहे. तसेच खुल्या प्रवर्गात 149 पैकी 74 प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.किमान 8 ते 10 खुल्या प्रवर्गाच्या प्रभागांत महिलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेतील महिलाराजला कोणी रोखू शकणार नाही.
मुंबई महानगरपालिका प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये 227 प्रभागांपैकी 114 प्रभाग महिलांसाठी राखीव झाले असून 113 प्रभागांत पुरुष कार्यकर्ते निवडणूक लढू शकतात. त्यामुळे आरक्षणामध्येच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा एकने जास्त आहे.