

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये बोरिवली, प्रभादेवी, पायधुनी आदी भागातील सर्वच्या सर्व प्रभाग आरक्षणामध्ये गेले आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील इच्छुकांना आजूबाजूच्या प्रभागातही निवडणूक लढवता येणार नाही. कुर्ल्यामध्ये मात्र 16 पैकी अवघे सहा प्रभाग आरक्षित झाले आहेत. त्यामुळे आरक्षित प्रभागातील इच्छुकांना अन्य प्रभागात निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे.
प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये महापालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीतील 152 प्रभागांमध्ये आरक्षण पडले आहे. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी व खुल्या प्रवर्गातील महिला असे आरक्षण आहे. परंतु या आरक्षणाचा काही विभाग कार्यालयाच्या हद्दीतील माजी नगरसेवकांसह इच्छुक कार्यकर्त्यांना मोठा फटका बसला आहे.
बोरिवलीच्या आर मध्य विभागात दहा प्रभाग असून दहाही प्रभाग आरक्षणामध्ये गेले आहेत. प्रभादेवी जी दक्षिण विभागातील सातही प्रभाग आरक्षित झाले आहेत. पायधुनी डोंगरी बी विभागात अवघे दोन प्रभाग असून दोनही प्रभाग आरक्षणात गेले आहेत. मात्र कुर्ला एल विभागात 16 प्रभागांपैकी अवघ्या सहा प्रभागांत आरक्षण पडले आहे. अन्य प्रभागांत मात्र निम्म्यापेक्षा जास्त प्रभाग आरक्षणांमध्ये गेल्यामुळे इच्छुकांची मोठी गोची झाली आहे.
दहिसर आर उत्तर विभागात 8 प्रभागां पैकी 6 प्रभाग आरक्षित झाले आहेत. सांताक्रुझ एच पूर्व विभागात दहा प्रभाग असून सात प्रभाग आरक्षित झाले आहेत. घाटकोपरमध्येही 11 प्रभागांपैकी 9 प्रभाग आरक्षित झाले आहेत. एफ उत्तर माटुंग्यामध्ये दहापैकी आठ प्रभाग, तर दादर जी उत्तर विभागातील 11 प्रभागांपैकी सात प्रभाग आरक्षित झाले आहेत.
आपला प्रभाग आरक्षणात
गेला तर बाजूच्या प्रभागात निवडणूक लढवता येईल यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू आहे. मात्र अनेकांचे आजूबाजूचे प्रभागही आरक्षित झाल्यामुळे त्यांचे नगरसेवक बनण्याचे स्वप्न अधुरेच राहणार आहे.