मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये काहींनी प्रभाग गमावले, तर काहींनी मिळवले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कही खुशी.. कही गम आहे.
मंगळवारी सकाळी 11 वाजता वांद्रे पश्चिमेकडील बालगंधर्व सभागृहात महापालिका निवडणुकीसाठी मुंबईतील 227 प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, निवडणूक अधिकारी विजय बालमवार, उपायुक्त विश्वास शंकरवार व अन्य निवडणूक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कुणाचा प्रभाग जातो आणि कुणाचा राहतो याबद्दल कमालीची उत्सुकता असल्याने सर्वच पक्षांच्या माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारही उपस्थित होते. तब्बल चार वर्षांनंतर महापालिका निवडणूक होणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसला.
सुरुवातीला अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आले. हे आरक्षण सोडत पद्धतीने न काढता त्या त्या प्रभागातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची असलेली लोकसंख्या लक्षात घेऊन उतरत्या क्रमाने 17 प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात अनुसूचित जातीच्या 15, तर अनुसूचित जमातीच्या 2 प्रभागांचा समावेश आहे. अनुसूचित जातीच्या प्रभागांतून आठ प्रभाग महिला अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले, तर अनुसूचित जमातीच्या दोन प्रभागांतून एक प्रभाग महिलेसाठी आरक्षित करण्यात आला.
अशी निघाली सोडत
या आरक्षणानंतर उर्वरित 210 प्रभागांचे नंबर असलेले कागदी रोल उपस्थितांच्या साक्षीने एका पारदर्शक ड्रममध्ये टाकण्यात आले. या ड्रममध्ये टाकलेले कागदी रोल वांद्रे येथील लक्ष्मी नगर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आले. सुरुवातीला नागरिकांचा मागासवर्ग म्हणजेच ओबीसीसाठी 61 प्रभाग आरक्षित करण्यात आले.
या 61 प्रभागांतून 31 प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. यासाठी सोडत काढण्यात आली. त्यानंतर 149 प्रभागांतून खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी 74 प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले. त्यामुळे उर्वरित 75 प्रभाग खुल्या प्रवर्गात शिल्लक राहिले.
ही सोडत पूर्णपणे नव्याने काढण्यात आल्यामुळे नेमक्या कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडणार, याचा उपस्थित राजकीय कार्यकर्ते अंदाज बांधू शकले नाहीत. त्यामुळे हे आरक्षण माजी नगरसेवकांसह इच्छुकांसाठी नशिबाचा खेळ ठरले.