Mumbai BMC Election Results
मुंबई : मुंबई महानगरपालिकेवर गेली तीन दशके कायम असलेली ठाकरेंची सत्ता उलथवून लावत भारतीय जनता पक्षाने दणदणीत ८९ जागा जिंकल्या आणि महायुतीचा 'पुढारी' म्हणून मुंबईची सत्ता काबीज केली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या या निवडणुकीत भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेला सोबत घेत ठाकरेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यांत ललकारले. या लढाईत शिंदे सेनेची मात्र पिछेहाट झाली. याउलट भाजपने मात्र आजवरच्या सर्वाधिक ८९ जागा जिंकल्या. पराभवानंतर ठाकरे सेनेचे अखिल चित्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ७ संतप्त प्रश्न करत जोरदार टीका केली आहे.
उद्धव आणि राज हे दोघे भाऊ एकत्र आल्याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहील, हा अंदाज फोल ठरला. फंदफितुरी होऊनही ठाकरेंनी ६५ जागा खेचून आणल्या. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ४० हून अधिक माजी नगरसेवक पक्ष सोडून गेले आणि ठाकरेंच्याच सेनेविरुद्ध मैदानात उतरले. तरीही ठाकरेंची सेना जिद्दीने लढली.
निकालानंतर अखिल चित्र यांनी 'एक्स' पोस्ट केली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना टॅग करत खालील प्रश्न विचारले आहेत.
१) स्वतःला शिवसेना आणि स्व. बाळासाहेबांचे पाईक म्हणवणाऱ्यांनो काय मिळवलंत ?
२) ज्या मुंबईत स्व. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापिली तिथून शिवसेना हद्दपार करण्याच्या कटाचे भागीदार होऊन काय मिळवलंत ?
३)“मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे” ह्या स्व. बाळासाहेबांच्या निर्धाराला मूठमाती देऊन काय मिळवलंत ?
४) सत्तेच्या लाचारीत मश्गूल होऊन, शिवसेना फोडून, भाजपाला पाठिंबा देऊन मुंबई कमळीच्या दावणीला बांधून काय मिळवलंत ?
५) चिन्ह, पक्ष, नेते आणि नंतर शिवसेनेचे ५६ नगरसेवक फोडून निवडून आणलीत फक्त २८ माणसं, मग शिवसैनिकाला दुबळं करुन काय मिळवलंत ?
६) शिवसेनेचं प्रभुत्व नाकारून आता भाजपाचा महापौर होईल, राजधानीतून मराठी अस्मितेची तिरडी उचलून काय मिळवलंत ?
७) थैलीशहांना आपली मुंबई स्वार्थासाठी विकून काय मिळवलंत ?
तुमच्याकडे एकंच उत्तर असेल कि, 'आलिशान आयुष्य मिळवलं' पण उद्या जेव्हा मराठी माणसाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मिंद्यांनो तुम्ही मुंबईतून शिवसेना संपवायच्या कटात सामील होतात याची इतिहास नोंद घेईलच आणि हा ठपका घेऊनच तुमचे वारसदार जगतील, असा घणाघात चित्रे यांनी केला आहे.
चित्रे यांनी पुढे लिहिले आहे की, अर्थात फंदफितुरी ह्या मातीला नवीन नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनाही सर्वाधिक स्वकीयांविरुद्ध लढावं लागलं होतं. आम्हीही त्याच राजांचे मावळे तितक्याच त्वेषाने लढू, इथल्या खडकांवरसुद्धा दुहीची बीजं रुजतात असं म्हणतात ह्याचाच फायदा कमळीने घेतला, पण एक निश्चित आम्ही राजधानी मुंबईतून ना स्व. बाळासाहेबांचा विचार पुसू देऊ, ना स्व. बाळासाहेबांची शिवसेना."