Congress Mumbai BMC Election
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
वडेट्टीवार म्हणाले की, "आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही. मुंबई महानगरपालिका ही जगातील सर्वात मोठी महानगरपालिका असल्याचे सांगत, वडेट्टीवार यांनी स्वबळाच्या निर्णयाचे समर्थन केले. स्वतंत्र लढणार असल्याने कोणाला किती जागा? हा प्रश्न निर्माण होत नाही. आम्ही मुंबईत लढत आलो आहोत. महायुतीचे तीन पक्ष वेगळे लढत आहेत. त्यांचे विभाजन होत नाही, असे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवरची परिस्थिती लक्षात घेऊन आमच्या त्या-त्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे. नाशिक मधील काँग्रेसच्या नेत्यांनी मनसे सोबत जाण्याचा निर्णय घेतला असेल तर तो नाशिक पुरता आहे, असे आम्ही मानतो. स्थानिकला राजकीय परिस्थिती बघून घेतलेला तो निर्णय आहे, त्यामुळे फार वाद निर्माण होईल अशी परिस्थिती नाही. आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षांनी ज्यांना या निवडणुकीत आघाडी करायची आहे, त्यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घ्यावा ही स्पष्ट भूमिका असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
"शरद पवार मूळ ओबीसी कोणाला म्हणतात? आमचं म्हणणं आहे की मुळ ओबीसी म्हणजे बारा बलुतेदार, छोट्या-छोट्या जाती आणि त्यातल्या त्यात 294 च्या सूची प्रमाणे पाहिलं तर ते मूळ ओबीसी. पण आता पवार साहेब मुळ ओबीसी कोणाला देतात, आमची सुद्धा मागणी आहे मूळ ओबीसीलाल दिला पाहिजे. हैदराबाद गॅझेट वापर करून कुणबी-मराठा, मराठा-कुणबी असेल तर त्यांना उमेदवारी देणार का ते आम्ही बघू. आता पवार त्यांची आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सर्वांनी मिळून मूळ ओबीसींना न्याय दिला पाहिजे. त्याच आम्ही स्वागत करतो आणि आमची भूमिका तीच राहील," असे वडेट्टीवार म्हणाले.