Mumbai Drainage Issues pudhari photo
मुंबई

Mumbai Drainage Issues : दिवाळीतही मुंबईत नाले तुंबलेलेच!

सत्ताधारी-विरोधकांचा प्रशासनाला घेराव

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : ऐन दिवाळीत मुंबईतील नाल्यांची साफसफाई न झाल्याने साचलेला कचरा, दुर्गंधी आणि रस्त्यांवर वाहणारे सांडपाणी यावरून मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनी प्रत्यक्ष नाल्यांची पाहणी करून हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आणि पालिका प्रशासनाच्या नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल केली. या मुद्द्याला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीही पाठिंबा देत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.

स्थायी समितीच्या बैठकीत यामिनी जाधव यांनी हरकतीचा मुद्दा मांडत सांगितले की, प्रत्यक्ष पाहणी केली असता नालेसफाई अजिबात झालेली नसल्याचे समोर आले आहे. ऐन दिवाळीत नाले तुडुंब भरलेले असून दुर्गंधी पसरली आहे. हे काम ज्या कंत्राटदाराकडे आहे, त्या कंत्राटदाराला नाल्याचे नावही ठाऊक नाही.

तसेच पालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष भेटीदरम्यान उपस्थित नसतात. तर कंत्राटदार मलई लाटण्यासाठी केवळ पावसाळ्याची वाट पाहत बसतात का, असा संतप्त सवाल करत नाले तुंबल्याने घाण पाणी थेट रस्त्यांवर येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर श्रद्धा जाधव यांनीही, ’आपल्याकडे यंत्रणा आणि निधी असतानाही आपण इतके हतबल झालो आहोत का?’ असा सवाल उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला.

पोईसर परिसरातील नाल्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगत नगरसेवक झा यांनी इशारा दिला की, नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचल्याने ऐन दिवाळीत एखादा जरी फटाका तिथे पडला, तरी भीषण आग लागण्याची शक्यता आहे.

हद्दींच्या तांत्रिक पेचावर बोलताना नगरसेविका राजेश्री शिरवाडकर म्हणाल्या की, अनेक नाले हे वनविभाग आणि मिठागरांच्या हद्दीत येतात; त्या ठिकाणी पोकलेन मशीन जाऊ शकत नसल्याने सफाई ठप्प होते, त्यामुळे प्रशासनाने मिठागर अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून संयुक्त उपाययोजना करावी. या हरकतीच्या मुद्द्याला पाठिंबा देत राखी जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली.

नाल्यांची पाहणी करण्याचे निर्देश

सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही नालेसफाईच्या मुद्द्यावर प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहून स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले. संबंधित नाल्यांच्या सद्यस्थितीची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन घ्यावी, वस्तुस्थिती तपासावी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी समस्यांचे तातडीने निरसन करावे, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT