मुंबई: नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नाला महापालिका आयुक्तांनी तब्बल पाच वर्षांनी उत्तर दिले. या काळात दोन आयुक्तांच्या बदल्या झाल्या.
त्यामुळे त्या आयुक्तांच्या काळात विचारलेल्या प्रश्नांना विद्यमान आयुक्तांमार्फत महापालिका सभागृहामध्ये उत्तर सादर करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाच्या या अजब कारभाराची गजब कथा ऐकून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
मुंबई महापालिका सभागृहात विचारलेल्या प्रश्नाला आठवडाभरात उत्तर मिळणे अपेक्षित असते. खूपच उशीर झाला तर महिन्याभरात उत्तर मिळायलाच हवे. मुंबई महापालिकेमध्ये अजब कारभार बघायला मिळतो.
मुंबई महापालिका सभागृहामध्ये २०२१ मध्ये तत्कालीन नगरसेवक सुषमा राय, तुलीप मिरांडा, समाधान सरवणकर, सुजाता पाटेकर यांनी आयुक्तांना काही प्रश्न विचारले होते.
या प्रश्नाचे उत्तर तत्कालीन महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि त्यानंतर आलेले भूषण गगराणी यांनी दिले नाही. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर महापालिका आयुक्त पदी अश्विनी भिडे आल्यानंतर नगरसेवकांच्या प्रश्नाला आता उत्तरे देण्यात आली आहेत.
नगरसेवकांनी विचारलेले किरकोळ प्रश्न
1. जेडब्ल्यू मॅरियट या इमारतीचे बांधकाम कोणत्या नगर भूमापन क्रमांकात येते
आयुक्त - नगर भूमापन क्रमांक १४८३ डी मरोळ गाव
2. केंद्र सरकारने २०१५ मध्ये जाहीर केलेल्या अमृत योजनेची महापालिकेने अंमलबजावणी केली. हे खरे आहे काय ?
आयुक्त - होय, हे खरे आहे
3. न्यू प्रभादेवी रोड येथे नगर रचना योजना क्रमांक ४ अंतर्गत प्लॉट क्रमांक १०९१ येथे व्यावसायिक इमारत आहे हे सत्य आहे काय ?
आयुक्त - होय, हे खरे आहे
4. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत काम करणाऱ्या संस्थांच्या पात्रतेबाबत निकष अटी व नियम काय ?
आयुक्त - होय अटी आहेत.
प्रश्न जाणून घेण्यास उदासिनता
मुंबई महापालिका प्रशासनाच्या या कासवगती कारभाराबद्दल नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई महापालिका सभागृह हे सर्वोच्च असताना येथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तातडीने मिळणे अपेक्षित आहे. मात्र सभागृहातील प्रश्नांबाबत महापालिका प्रशासन गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे उत्तरांना इतका विलंब लागत असल्याची मुख्यालयातील सभागृहात चर्चा सुरु होती.
असेच चालू राहणार असेल तर सर्वोच्च सभागृहाचे महत्त्व कमी होईल, असे मत नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.