Mumbai FDA Action: हॉटेलच्या स्वयंपाकघरात झुरळांचा सुळसुळाट! उघडे अन्न अन् मुदतबाह्य माल; मुंबईत एफडीएचा 6 आस्थापनांना दणका

मुंबईत एफडीएच्या कारवाईत परवाने निलंबित; झुरळांचा संचार, मुदतबाह्य माल, नियमांची पायमल्ली
Mumbai FDA Action
Mumbai FDA ActionPudhari
Published on
Updated on

मुंबई: झुरळांचा सुळसुळाट, उघडे अन्नपदार्थ, मुदतबाह्य कच्चा माल, अस्वच्छ स्वयंपाकघर, कर्मचाऱ्यांची अपुरी वैद्यकीय तपासणी व अन्नसुरक्षा नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्या मुंबईतील मालाड, बोरिवली, गोरेगाव, घाटकोपर, मुलुंड येथील अन्न आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे.

मुंबईतील सहा आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, जुहू येथील इस्कॉनच्या तीन अन्न आस्थापनांवरही परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांना अन्नपुरवठा करणाऱ्या कुर्ल्यातील बेस किचनचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

एफडीएच्या कारवाईमुळे खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एफडीएच्या मुंबईतील कारवायांच्या दणक्यांमुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

विक्रोळीच्या कॅफेत उघडे चिकन, अस्वच्छ भांडी

विक्रोळीतील हरियाली व्हिलेल, टागोरनगर येथील बॉम्बेज द फूड फ्यूजन कॅफेची एका व्हायरल तक्रारीनंतर ५ सप्टेंबरला तपासणी करण्यात आली. ९८ पैकी केवळ ५१ गुण मिळाल्याने आस्थापना नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळले.

Mumbai FDA Action
Maharashtra FDA Action: औषधांच्या ‘चलता है’ संस्कृतीला एफडीएचा दणका; ३ महिन्यांत ८८० परवानाधारकांवर कारवाई

उघडे ठेवलेले भात, उघड्या भांड्यातील कच्चे चिकन, व्यवस्थित बंद न केलेल्या चिरलेल्या भाज्या आणि योग्य तापमान न राखणारा फ्रीज आढळला. स्वयंपाकघरातील फरशी अस्वच्छ होती. निचरा व्यवस्था सदोष होती, तर भिंतीवरील प्लास्टर निघाले होते.

भांडीही अस्वच्छ आणि अन्नाच्या अवशेषांनी माखलेली होती. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, लसीकरण, अन्नसुरक्षा प्रशिक्षण, पाण्याच्या तपासणीच्या नोंदी आणि प्रयोगशाळा तपासणीचे अहवाल उपलब्ध नव्हते. त्यामुळे परवाना निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे.

मुलुंडमध्ये दुकानाच्या आडून अनधिकृत उत्पादन

मुलुंड पश्चिम येथील कोठारी स्वीट आणि मुलुंड फरसाण मार्ट या दोन्ही आस्थापनांवरही एफडीएने कारवाई केली. दोन्ही ठिकाणी किरकोळ विक्रीच्या दुकानामागे वैध परवान्याशिवाय उत्पादन युनिट सुरू असल्याचे आढळले.

कोठारी स्वीटमध्ये पाण्याची अयोग्य व्यवस्था, अन्नाच्या जवळ झुरळे व माश्यांचा प्रादुर्भाव आणि मुदतबाह्य कच्चा माल आढळला. मुलुंड फरसाण मार्टमध्येही जवळपास तशाच त्रुटी आढळल्या.

Mumbai FDA Action
MPSC Paper Leak: एमपीएससी पेपरफुटीची ‘शिक्षा’; ४४,५०० उमेदवारांची पुन्हा ‘परीक्षा’

जुहू येथील इस्कॉनच्या शीतगृहामध्ये अस्वच्छता

जुहू येथील इस्कॉनच्या तीन अन्न आस्थापनांवरही एफडीएने परवाना निलंबनाची कारवाई केली आहे. मुख्य अन्न आस्थापनात पाण्याच्या नियमित तपासणीच्या नोंदी नव्हत्या. इस्कॉन फूड सर्व्हिसेस रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकघराचा मागील प्रवेश खुला होता.

नाल्यात अन्नकचरा साचलेला आणि साठवणूक कक्षात कीटकांची विष्ठा आढळली. इस्कॉन गोविंदास रेस्टॉरंटमध्येही अन्नपदार्थांच्या प्रयोगशाळा चाचण्या आणि कच्च्या मालाच्या खरेदीच्या नोंदी नव्हत्या.

गोरेगावच्या बिर्याणी सेंटरवरही कारवाई

गोरेगाव पूर्वेतील महाराष्ट्र बिर्याणी सेंटरमध्ये स्वच्छता, अन्न साठवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. गंजलेला दरवाजा, उखडलेले प्लास्टर व रंग, घसरडा फरशी, अपुरी साठवणूक आणि निचरा व्यवस्थेतील त्रुटी निदर्शनास आल्या. यापूर्वी सुधारणा नोटीस देऊनही समाधानकारक सुधारणा न झाल्याने परवाना निलंबित करण्यात आला.

उघड्या कचऱ्याजवळ बनतोय स्वयंपाक

  • आयआरसीटीसीअंतर्गत रेल्वे प्रवाशांना अन्नपुरवठा करणाऱ्या बेस किचन आणि फूड प्लाझांची एफडीएने तपासणी केली.

  • मुंबई, ठाणे परिसरातील पाच आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कुर्लापश्चिम येथील आर. के. असोसिएट्स अँड हॉटेलियर्स प्रा. लि. या बेस किचनचा परवाना निलंबित करण्यात आला, तर चार आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या.

  • अन्न साठवणूक व प्रक्रिया परिसरात झुरळांचा प्रादुर्भाव आढळला. अन्नपदार्थ झाकून ठेवले जात नव्हते. उघड्या कचऱ्याजवळ स्वयंपाक केला जात होता.

  • एका कर्मचाऱ्याला दुखापत झालेली असतानाही तो अन्न हाताळत असल्याचे निदर्शनास आले.

बोरिवलीत रेस्टॉरंट, नोंद फिरत्या विक्रेत्याची

बोरिवली पूर्वेतील श्री मधुरम या आस्थापनाची नोंदणी फिरता किंवा मोबाइल खाद्यविक्रेता म्हणून होती; मात्र प्रत्यक्षात ते रेस्टॉरंट म्हणून सुरू असल्याचे तपासणीत उघड झाले. पाणी तपासणी, कीटक नियंत्रण, अन्नसुरक्षा प्रशिक्षण व कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे नोंदणी निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे.

झेप्टोच्या केंद्रात झुरळांचा सुळसुळाट

मालाड पश्चिम येथील ड्रोघेरिया सेलर्स प्रा. लि. (झेप्टो) या आस्थापनावरही एफडीएने कारवाई केली. तपासणीदरम्यान जिवंत झुरळे आढळली. अंड्यांच्या बॉक्ससह डिलिव्हरी कॅफे आणि अन्न साठवणूक परिसरात झुरळांचा प्रादुर्भाव होता.

अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रार पोर्टलवरही तक्रार नोंदवता येते. मुदतबाह्य, भेसळयुक्त किंवा नियमांचे उल्लंघन करून तयार केलेल्या अन्नपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी तपासणी व कारवाईची मोहीम सुरूच राहणार आहे.

-तुकाराम मुंढे एफडीए आयुक्

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news