BMC  pudhari photo
मुंबई

Mumbai BMC Committee Meetings: मुंबई महापालिकेत एकाच दिवशी तीन समित्यांच्या सभा; प्रशासनासह नगरसेवकांची दमछाक

सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांचे नगरसेवक नाराज

पुढारी वृत्तसेवा

प्रकाश साबळे

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपा, शिंदेची शिवसेना सत्तेवर आल्यानंतर पालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांवर नगरसेवकांचे अध्यक्ष म्हणून कामकाज सुरु आहे.

परंतु या समिती अध्यक्ष आणि महानगरपालिकेच्या सचिव विभागाकडून जाणुनबुजून विरोधी पक्षातील नगरसेवकांना आणि प्रशासनातील अधिकारी यांना अंधारात ठेवून एकाच दिवशी तीन ते चार समित्यांच्या सभा आयोजित केल्या जात आहेत.

मंगळवार, दि. २८ जुलै रोजी महानगरपालिका मुख्यालयात एकाच दिवशी दुपारी १२ वाजता सुधार समिती सभा, दुपारी १ वाजता स्थापत्य समिती उपनगरे सभा आणि दुपारी ३ वाजता वृक्ष प्राधिकरण सभा ठेवण्यात आली होती. परिणामी नगरसेवक आणि पालिका प्रशासनामध्ये गोंधळ उडाला असून विरोधकांनी समिती अध्यक्ष आणि सचिव विभागावर जोरदार हल्ला केला आहे.

मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या या तिन्ही समितीच्या अध्यक्ष आणि सचिव विभागातील जुलै महिन्यांतील २७ दिवस वाया घातली आहेत. समिती अध्यक्ष आणि सचिव विभागातील ढिसाळ कारभारामुळे नगरसेवक आणि महानगरपालिका अधिकारी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महत्वाच्या प्रस्तावांवर विरोधकांना बोलता येवू नये, म्हणून महिन्याच्या शेवटी सभा उरकण्याचा, उद्देश असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नगरसेवकांकडून करण्यात आला.

दहिसर ते कुलाबापर्यतचे अनेक नगरसेवक हे आजही रेल्वेने महानगरपालिका मुख्यालयात येतात. अशावेळी सकाळी ११ किंवा १२ वाजता समित्यांच्या सभा ठेवत असल्याने उपनगरांतील अनेक नगरसेवक, महानगरपालिका अधिकारी व माध्यम प्रतिनिधी यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

समिती अध्यक्षांना प्रशासनाकडून गाड्या, चालक दिले आहेत. मात्र अधिकारी, कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधी यांना रेल्वेचा प्रवास करत महापालिका मुख्यालय गाठावे लागते. लोकलला सकाळी १२ वाजेपर्यंत प्रचंड गर्दी असते.

अशा गर्दीचा सामना करत नगरसेवक, पालिका अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी यांना समितीच्या बैठकीस उपस्थित राहावे लागत असल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. याकडे समिती अध्यक्ष आणि सचिव विभागाने लक्ष देण्याची मागणी सत्ताधारी पक्षांतील नगरसेवकांसह विरोधी सदस्यांकडून करण्यात आली.

मंगळवार, २८ जुलै रोजीच्या समित्यांच्या सभा

  • सुधार समिती सभा - वेळ १२ वाजता

  • स्थापत्य समिती उपनगरे सभा - वेळ १ वाजता

  • वृक्ष प्राधिकरण सभा - वेळ ३ वाजता

एकाच दिवशी तीन समित्या घेतल्यामुळे प्रशासनाचा गोंधळ उडतो. महिन्याला एक सभा असते. हे सचिव विभागाचे अपयश आहे. सुधार समिती अध्यक्ष आणि स्थापत्य समिती अध्यक्ष यांनी जुलै महिन्यातील २७ दिवस वाया घातले आहेत. महानगरपालिकेचे सचिव विभाग बैठका नियोजित करतात. त्यांनी एकाच दिवशी बैठका घेतल्या कशा? यापुर्वी आम्ही सभागृहात आवाज उठविला होता. मात्र तरीसुद्धा सत्ताधारी ऐकत नाही.
- सचिन पडवळ, सदस्य, सुधार समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT