मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाचे आकारमान वाढणार असून ही वाढ सुमारे 12 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे समजते. त्यामुळे अर्थसंकल्प सुमारे 83 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. 2025-26 या आर्थिक वर्षाचे सुमारे 74 हजार 427 कोटी 41 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.
मुंबई महानगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्यात येणार आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे आकारमान दरवर्षी वाढत असून 2024-25 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पाचे आकारमान 65 हजार 180 कोटी रुपये इतके होते. 2025-26 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पाचे आकारमान 14.19 टक्क्याने वाढून, 74 हजार 427 कोटी रुपयांवर गेले. यात अजून 8 ते 9 हजार कोटी रुपयांनी वाढ होणार आहे. यावेळी अर्थसंकल्पात जुन्याच कामांना प्राधान्य देऊन त्यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. यात सध्या शहरात सुरू असलेल्या सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प, सिमेंट काँक्रेट रस्ते, वर्सोवा दहिसर कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, दहिसर मीरा-भाईंदर उड्डाणपूल, पाणीपुरवठा प्रकल्प व अन्य प्रकल्पांचा समावेश आहे.
नव्या कामांमध्ये गारगाई पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्पासाठी मोठी आर्थिक तरतूद होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय समुद्राचे गोडे पाणी कार्य करण्याच्या प्रकल्पासाठीही आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचे समजते. नद्यांचे रुंदीकरण व खोलीकरण तसेच नाल्यांचे बांधकाम, रस्ते लगतची गटारे, उद्यान, राणीबागचा विस्तारित प्रकल्प आदींसाठीही अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे समजते. मुंबई शहर व उपनगरात सध्या मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुमारे 2 लाख 32 हजार 412 कोटीची कामे सुरू आहेत. त्यामुळे मोठ्या निधीची आवश्यकता भासणार आहे. यासाठी विविध बँकांमध्ये असलेल्या काही मुदत ठेवीही मोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील पायाभूत सुविधांसाठी 2025-26 या आर्थिक वर्षात 43 हजार 162 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. या सर्वाधिक आर्थिक तरतूद मुंबई मलनि: सारण प्रकल्प, कोस्टल रोड, पाणीपुरवठा, रस्ते यासाठी करण्यात आली होती. यावेळी पायाभूत सुविधांच्या तरतुदीमध्ये 8 ते 10 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीत सादर होणार अर्थसंकल्प
मुंबई महानगरपालिका अस्तित्वात येणार असून 2 फेब्रुवारीला स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे 4 फेब्रुवारीला पालिकेचा अर्थसंकल्प नवनियुक्त अध्यक्षांकडे सादर करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.