मुंबई: बालमृत्यूंमध्ये जन्मजात विकृती हे प्रमुख कारण समोर आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने हे मृत्यू रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील सर्वच रुग्णालयांसह सोनोग्राफी केंद्रांवर अनोमली स्कॅन (सोनोग्राफी) बंधनकारक करण्यात येणार आहे.
तसा ठराव तयार करण्यात आला असून तो लवकरच पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. गर्भातील विकृतींचे वेळेवर निदान करून वैद्यकीय उपचार यामुळे शक्य होणार आहे.
राज्य सरकारने सर्व गर्भवती महिलांनी गर्भधारणेच्या 18 ते 20 आठवड्यांच्या कालावधीत अनोमली स्कॅन (सोनोग्राफी) करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालये, प्रसूतीगृहे, सोनोग्राफी तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञांना अनोमली स्कॅन बंधनकारक करण्याबरोबरच ही तपासणी नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली आहे.