मुंबई: अलिबागनंतर आता मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरही जेलीफिश सदृष्य जीव ब्लू बॉटल दिसत आहेत. निळ्या रंगाचे हे जीव मोठ्या संख्येने किनाऱ्यांवर वाहून येत आहेत. ते दिसायला आकर्षक आहेत पण ते विषारीही आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेण्याची गरज आहे.
पावसाळ्याच्या आधी (मे-जून) आणि पावसाळ्यात (जून-ऑक्टोबर) दरम्यान हे ब्लू बॉटल किंवा ब्लू बटन वाहून येतात.जुहू बीच, गिरगाव चौपाटी, अलिबाग, वरसोली आणि नागाव यांसारख्या प्रमुख किनाऱ्यांवर हे प्रामुख्याने आढळतात.
हे जीव दिसायला आकर्षक, निळ्या रंगाचे आणि प्लास्टिकच्या छोट्या पिशव्या किंवा बटनांसारखे दिसतात. ते दिसायला सुंदर असले, तरी ते अत्यंत विषारी असतात. त्यांच्या लांब तंतूंमध्ये विष असते, ज्याच्या स्पर्शाने त्वचेवर तीव्र जळजळ, खाज, लालसर पुरळ आणि तीव्र वेदना होऊ शकतात.
स्पर्श टाळा : आकर्षक दिसत असले तरी, या जीवांना उघड्या हाताने अजिबात स्पर्श करू नका.
पायांत चप्पल/बूट : किनाऱ्यावर चालताना उघड्या पायाने चालू नका. चुकून पाय पडल्यास दंश होऊ शकतो. पाण्यात जाणे टाळा : समुद्रात पोहायला जाणे टाळा.
दंश झाल्यास काय?
घाबरून न जाता दंश झालेला भाग समुद्राच्या पाण्याने धुवावा. जास्त त्रास होत असल्यास तो भाग गरम पाण्यात (अंगाला सोसेल इतपत) 15 ते 20 मिनिटे बुडवून ठेवावा. ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.