मुंबई : मुंबईत काही ठिकाणी वीजेचा लंपडाव सुरू आहे, मात्र हा वीज पुरवठ्यातील दोष नसून रस्ते कामांचा फटका आहे. खोदकामामुळे जमिनीखालून जाणार्या विजेच्या केबलला धक्का बसत असल्याने वीजपुरवठा खंडीत होण्याच्या घटना वाढल्या आहेत. दोन महिन्यांत आशा प्रकार 50 पेक्षा जास्तवेळा ब्लॅकआऊट झाला आहे.
पावसाळ्यात बंद असलेले काँक्रिटची कामे पुन्हा जामाने सुरू झाली आहेत. मात्र रस्त्याच्या खालून गेलेल्या विद्युत केबलसह टेलीफोन केबल, जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्या, पर्जन्य जलवाहिन्यांना याचा फटका बसत आहे. रस्ता खोदताना केबल व वाहिन्यांना धक्का बसत आहे. विद्युत केबल तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. दोनच दिवसांपूर्वी परळगाव येथील नाक्यावर केबल तुटल्यामुळे संपूर्ण परळ भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यात 50 पेक्षा जास्त ठिकाणी विद्युत केबल तुटल्या आहेत.
काम करणार्या कामगारांना मुळात युटीलीटींची माहिती नसल्याने हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे युटीलीटी असलेल्या जागांची माहिती घेत खोदकामे करावी अशी मागणी मुंबईकर करीत आहेत. विद्युत प्रवाह खंडित झाल्यानंतर नागरिकांची ओरड झाल्यानंतर केबल तुटल्याचे समोर येत आहे. त्यानंतर विद्युत केबल जोडून, विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास चार ते पाच तासांचा कालावधी लागत आहे. परळ गाव येथे तुटलेली केबल दुरुस्तीला एक दिवस लागला होता.
काळजीपूर्वक रस्ता खोदण्याच्या सूचना
रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्या खालून जाणार्या विद्युत केबल व अन्य वाहिन्यांना धक्का बसू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. परंतु कंत्राटदाराकडून फारसे गांभीर्याने घेत नसल्यामुळे केबल तुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे यापुढे केबल तुटल्यास त्याला कंत्राटदाराला जबाबदारी धरून, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पालिकेच्या रस्ते विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांकडून सांगण्यात आले.