BEST  Pudhari
मुंबई

BEST Budget Dispute: बेस्टच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांमध्येच खडाजंगी! अर्थसंकल्पीय प्रस्तावांवरून गणाचार्य-विश्वासराव आमनेसामने

best committee meeting: अर्थसंकल्‍पिय खर्च, अनुदानाचे प्रस्ताव घाईघाईत मंजूर केल्याने सभेत गोंधळ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्पीय खर्च, अतिरिक्त अनुदान मंजुरी प्रक्रियेवरून सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपाचे सदस्य सुनील गणाचार्य आणि शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका व बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

प्रशासनाने मांडलेल्या प्रस्तावावर समिती सदस्यांना चर्चा करण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेत अर्थसंकल्पाच्या दुरूस्ती तुम्ही समजून घेत नाही, याचा अर्थ तुम्हाला त्याबद्दल गांभीर्य नाही, अशा शब्दांत गणाचार्य यांनी विश्वासराव यांच्यावर टीकेचा प्रहार केला. मात्र, गोंधळाच्या वातावरणात घाईघाईत दोन्ही प्रस्ताव अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी मंजूर केल्याने सभेत गोंधळ निर्माण झाला होता.

बेस्ट उपक्रमाच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील खर्च, लेखापरीक्षण व अतिरिक्त अनुदान मंजुरी प्रक्रिये संदर्भातील प्रस्तावांवर सोमवारी बेस्ट समितीच्या विशेष बैठकीत जोरदार चर्चा झाली. हे दोन्ही प्रस्ताव जुलै महिन्यातच महापालिकेकडे पाठविणे अपेक्षित असताना सप्टेंबर अखेरपर्यंत ते का प्रलंबित ठेवण्यात आले, असा सवाल गणाचार्य यांनी उपस्थित केला.

प्रस्तावातील विविध तरतुदी आणि खर्चाच्या आकडेवारीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून याबाबत समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे गणाचार्य यांनी सभेत निदर्शनास आणून दिले. त्यामुळे प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेतील विलंब आणि कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

यातील काही चुका बेस्ट महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी यांनी मान्य करत त्यात आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे स्पष्ट केले. मात्र, प्रस्ताव तातडीने महापालिकेकडे पाठवणे आवश्यक असल्याचे सांगत बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी चर्चा आवरती घेत दोन्ही प्रस्ताव मंजूर केल्याने सभेत काही काळ चांगलीच खडाजंगी झाली.

त्यामुळे एकीकडे प्रशासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणारे सदस्य आणि दुसरीकडे सत्तापदाचा वापर करत सखोल चर्चेशिवाय प्रस्तावाला मंजुरी देणारे, असा सत्ताधाऱ्यांचा संघर्ष या बैठकीत दिसून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT