Police Pudhari
मुंबई

Mumbai Azad Maidan Protest: सीजेपी आंदोलनात कार्यकर्ते कमी, पोलिसच जास्त; ५०० पोलिसांचा बंदोबस्त, वाहनेही तैनात

दिल्लीतील सीजेपी नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या अटकेच्या निषेधार्थ आझाद मैदानावर आंदोलन; पोलिसांच्या तुलनेत आंदोलकांची संख्या कमी.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: सीजेपीच्या (कॉकरोच जनता पार्टी) ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनात शुक्रवारी आझाद मैदानावर कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांची संख्याच अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलनाला मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून मुंबई पोलिसांनी तब्बल ५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता.

मात्र, प्रत्यक्ष आंदोलनासाठी २५० पेक्षाही कमी जण उपस्थित राहिल्याने पोलिसांच्या व्यापक तयारीच्या तुलनेत आंदोलकांची संख्या अत्यल्प राहिली.

दिल्लीतील सीजेपी नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या अटकेच्या निषेधार्थ तसेच त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आंदोलनासाठी पोलिसांनी एक दिवसाची परवानगी दिली होती.

मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमण्याची शक्यता लक्षात घेऊन सकाळपासूनच आझाद मैदान परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. आंदोलनाला मोठी गर्दी झाल्यास आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो परिसर आणि लगतच्या रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता होती.

अपेक्षित गर्दीऐवजी मोजकेच आंदोलक

पोलिसांनी सुमारे ५०० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला असताना आंदोलनस्थळी सुरुवातीला ५० पेक्षाही कमी लोक उपस्थित होते.दुपारनंतर २५० च्या जवळपास संख्या दिसली, असे पोलिस सांगतात.

त्यामुळे संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेली मोठी तयारी आवश्यक ठरली नाही. आयोजकांनी सायंकाळी पाच वाजता आंदोलन शांततेत संपल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. कोणताही अनुचित प्रकार न घडता आंदोलन संपले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT