मुंबई : धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीसाठी रिक्षाचालकांकडून 500 रुपये प्रवेश फी आणि 300 रुपये वार्षिक फी भरण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सक्ती केली जात आहे. याच्या निषेधार्थ पूर्व व पश्चिम उपनगरातील रिक्षाचालक- मालकांनी अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
आपल्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी अंधेरी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आले. युनियनच्या मागणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. रिक्षाचालकांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येणार नाही असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले आहे.
परिवहन विभागाकडून करण्यात येणारी सक्ती बंद करण्यात आली नाही तर संघटनांतर्फे तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. सुमारे 2000 चालक-मालक या आंदोलनात सहभागी झाले होते.
याबाबतचे निवेदन 23 मार्च रोजी परिवहन मंत्री आणि परिवहन आयुक्तांना प्रादेशिक-उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आल होते. मात्र ऑटोरिक्षा चालकांच्या मागणीला न्याय मिळाला नाही. या मागणीची पूर्तता न झाल्याने संघटनेने बुधवारी राज्यभर हे आंदोलन केले.
मुंबईतील आंदोलनात दोन हजार रिक्षाचालक आणि मालक सहभागी झाले होते. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सक्ती करण्यात येणार नाही असे आश्वासित केले आहे. सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये बेकायदेशीरपणे करण्यात येणारी सक्ती तत्काळ बंद करावी तसेच रिक्षा चालकांची परिवहन विभागातील प्रलंबित कामे करावी, अन्यथा संघटनांतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल.शशांक राव, अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियन