मुंबई: पूर्व उपनगरातील चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, कुर्ला, वाशीनाका आणि परिसरात काही रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवासी त्रस्त झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय अधिकच होत असून पाऊस सुरू होताच काही रिक्षाचालकांकडून भाडे नाकारले जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
त्यातच मीटर वेगाने पडत असल्याच्या तक्रारीही करण्यात येत आहेत. रात्रीच्या वेळी प्रवाशांची संख्या कमी असल्याचा फायदा घेत काही चालकांकडून मनमानी भाडे आकारले जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
पावसाच्या दिवसांत बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच रिक्षा थांब्यांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. या परिस्थितीचा फायदा घेत काही रिक्षाचालक पाऊस पडताच प्रवाशांना भाडे नाकारतात. कमी अंतराचे भाडे घेण्यास टाळाटाळ करणे, ठराविक रकमेची मागणी करणे किंवा प्रवाशांची गरज लक्षात घेऊन अधिक भाडे आकारणे, असे प्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही प्रवाशांच्या मते, मीटरप्रमाणे भाडे आकारले जात असले तरी मीटर अपेक्षेपेक्षा वेगाने पडत असल्याने प्रवासाचे भाडे अधिक होत आहे.
भाड्यावरून वाद झाल्यास काही चालक प्रवाशांशी उद्धटपणे वागतात. शिवाजीनगर, मानखुर्द, गोवंडी आणि वाशीनाका परिसरात शेअरिंगच्या नावाखाली रिक्षाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवले जातात. चार ते पाच प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे न घेता स्वतंत्र भाडे आकारले जात असल्याने चालकांना आर्थिक फायदा होत असला तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.
काही चालक केवळ आपल्या पसंतीच्या मार्गावरील प्रवासी घेतात, तर कमी अंतराच्या प्रवाशांना भाडे नाकारले जाते. रेल्वे स्थानकाबाहेर व गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन अधिक भाडे आकारले जात असल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कारवाईची मागणी
रिक्षा सेवा ही मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे पावसात भाडे नाकारणे, मीटर वेगाने पडणे, जादा भाडे आकारणे, शेअरिंगच्या नावाखाली क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे आणि कमी अंतराचे भाडे नाकारणे अशा तक्रारींची संबंधित यंत्रणेकडून दखल घेण्याची गरज आहे.
प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि नियमांनुसार रिक्षा सेवा मिळावी, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.