मुंबई: पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी अशा तिहेरी दरवाढीचा एकत्र प्रस्फोट झाल्याने मुंबईतील कॅब,टॅक्सी व ऑटोरिक्षाचालकांचे कंबरडे मोडले असून, दिवसभर मुंबईत भटकूनही मालकाचे भाडे टेकवल्यानंतर हाती काहीही उरत नाही, अशी त्यांची स्थिती झाली आहे. परिणामी, मुंबईत ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक-मालकांकडून प्रवासी भाडेवाढीच्या मागणीने जोर धरला आहे.
मुंबईसह महानगर प्रदेशात पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत स्वस्त पर्याय म्हणून बहुतांश कॅब टॅक्सी व रिक्षाचालक सीएनजी वापरतात.आता सीएनजीचेही दर वाढल्याने चालकांच्या खिशाला रोज कात्री बसत आहे.
चालकांचे कंबरडे मोडले
टॅक्सी व कॅबचालकांना दिवसाला सरासरी 15 किलो सीएनजी लागत असल्याने महिन्याला 800 ते 900 रुपये सीएनजीसाठी जादा मोजावे लागत आहेत. दुसरीकडे;ऑटो रिक्षाचालकांना सीएनजीमुळे खिशातून महिन्याला सरासरी 250 रुपये ते तीनशे रुपये जास्त द्यावे लागत आहेत.
2022 मधील सीएनजी प्रतिकिलो 49 रुपये होता,तो आज 2026 मध्ये 84 रुपयांपर्यंत गेला आहे.मुंबईमध्ये चार वर्षांतील फरक पाहता सीएनजी दरामध्ये तब्बल 35 रुपये वाढ झाली असून त्या तुलनेत टॅक्सी मीटरमध्ये फक्त 6 रुपयांची वाढ झाली आहे. याचा अर्थ 4 वर्षांत इंधन खर्च 70 टक्क्यांनी वाढला आणि मीटर भाड्यात मात्र 24 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सध्या रिक्षाचे दीड किलोमीटरमागे 26 रुपये एवढे भाडे आहे, तर टॅक्सीचे दीड किलोमीटरमागे 31 रुपये एवढे भाडे आहे. रिक्षाचे भाडे 26 वरून 30 रुपये आणि आणि टॅक्सीचे 31 रुपयांवरून 35 रुपये एवढी भाडेवाढीची मागणी सुरू झाली आहे.
महाराष्ट्र श्रमिक सभा ऑटो-रिक्षा युनियनचे अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी सांगितले की, सीएनजीचे दर वाढल्याने इंधनासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे प्रति दीड किलोमीटरमागे भाडेवाढ करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. दुसरीकडे शशांक राव यांच्या ऑटोरिक्षाचालक मालक संघटनेची बैठक शनिवारी झाली. या बैठकीतही परिवहन आयुक्तांकडे भाडेवाढीची मागणी करण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
शेअर रिक्षा महागली
पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे दर भडकताच परिवहन खात्याच्या निर्णयाची कोणतीही वाट न पाहता मुंबईत शेअर रिक्षाचे भाडे वाढले आहे. आता शेअर रिक्षासाठी किमान भाडे 15 रुपये मोजावे लागेल. केवळ सीएनजी दरवाढीमुळे शेअर रिक्षा प्रवासी भाडेवाढ करावी लागली असल्याचे रिक्षाचालकांकडून सांगण्यात आले.
दिवसाला 15 किलो सीएनजी गॅस लागतो. त्यामुळे महिन्याला सरासरी 700 ते 800 रुपये ज्यादा पैसे पडतात. ओला,उबर या कंपनीकडून प्रतिकिलो 16 ते 18 रुपये प्रवासी भाडे आम्हाला मिळते. हे ठरवून दिलेले भाडे फारच कमी आहे.- आकाश बा.गायकवाड, कॅबचालक नवी मुंबई
वर्षातून सीएनजी गॅस दरवाढ दोन ते तीन वेळा होते.याचा फटका रिक्षाचालकांना बसत आहे. महिन्याला सरासरी 350 ते 300 रुपये खिशातून जादा जातात. त्यामुळे चालकांच्या नफ्यामध्ये घट होत आहे.- नवनाथ सोनवणे, रिक्षाचालक वाशी