नवी मुंबई: उन्हाच्या झळा पालेभाज्यांनाही बसल्या असून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत खराब शेतमाल येत आहे. त्यामुळे आवक चांगली असली तरी प्रतवारी नसल्याने पालेभाज्यांच्या दरात 5 ते 10 रुपयांची वाढ झालेली आहे.
घाऊक बाजारातील आकडेवारीनुसार, मंगळवारी लिंबूची 304 क्विंटल आवक होत दर 40 ते 60 रुपये प्रति किलोवर गेले तर टोमॅटोची आवक 1309 क्विंटल असूनही दर 20 ते 25 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते.
पालेभाज्यांमध्येही कोथिंबीर, मेथी, पालक आणि शेपू या सर्वच प्रकारांमध्ये आवक असूनही दर्जेदार माल कमी पडत आहे. पालेभाज्यांची पाने लवकर सुकत असल्याने बाजारात पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात शेतमाल खराब होत आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांना तुलनेने अधिक दर मिळत आहेत.
व्यापाऱ्यांच्या मते, मार्चच्या अखेरीपासून तापमानात झालेल्या वाढीमुळे पिकांवर ताण आला आहे. तसेच, वाढत्या उष्ण हवामानामुळे काढणीनंतरचा भाजीपाला लवकर सुकणे किंवा खराब होणे यामुळे प्रत्यक्ष विक्रीयोग्य मालाचे प्रमाण कमी होत आहे. परिणामी, आवक आणि उपलब्धता यामध्ये फरक निर्माण होऊन दर वाढत आहेत.