Mumbai APMC Market Pudhari
मुंबई

Mumbai APMC Market: ५२ किलोपेक्षा जास्त वजनाची गोणी उतरवण्यास माथाडींचा विरोध

मुंबई एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधील गोणी वजनाचा वाद तूर्तास मिटला; ५२ किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या उतरवण्यास माथाडी कामगारांचा विरोध.

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: मुंबई एपीएमसीतील कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापारी आणि माथाडी कामगारांमधील ५० किलोच्या गोणीवरून सुरू असलेला वाद तूर्तास मिटला. परंतु ५२ किलोपेक्षा जास्त वजनाची गोणी उतरविण्यास आजही माथाडी कामगार संघटनेने विरोध केला आहे. त्यामुळे सुमारे २५ ते ३० गाडी माल आजही तसाच गाडीत पडून राहण्याची दाट शक्यता आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी येत्या मंगळवारी ६ ऑक्टोबरला मंत्रालयात दुपारी चार वाजता पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या दालनात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

एपीएमसी प्रशासन, व्यापारी, आडते यांची शुक्रवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीत ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणीचा प्रश्न सुटेल, अशी शक्यता होती. माथाडी कामगार ५० ते ५२ किलो वजनाच्या गोणी खाली करण्यास तयार होते.

मात्र व्यापारी या निर्णयाला तयार नव्हते, असे नरेंद्र पाटील यांनी पुढारीशी बोलताना सांगितले. यावेळी माथाडी कामगारांनी कांदा-बटाटा मार्केटमध्ये १५ ते २० मिनिटे रस्ता रोको आंदोलन केले. पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे बैठकीचा निरोप मिळताच आंदोलन स्थगित करून मालाची चढ-उतार करण्यास माथाडी कामगारांनी सुरुवात केली.

यामुळे मुंबईत दिवसभरात ५० ते ६० गाडी माल आज पाठवला जाईल अशी माहिती घाऊक व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय पिंगळे यांनी दिली. व्यापाऱ्यांना बैठकीत बोलू दिले जात नाही. मात्र हा अन्याय सहन करणे आता शक्य नसल्याची भूमिका असोसिएशनच्या वतीने पिंगळे यांनी मांडली.

५२ किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणीतील कांदा, बटाटा माथाडी कामगारांनी उतरवला नाही तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. यामुळे व्यापारी चांगलाच अडचणीत सापडल्याचे पिंगळे यांनी म्हटले आहे. हा नाशवंत माल कालपासून गाडीत असल्याने कांदा सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT