Fruit Market Pudhari
मुंबई

Mumbai APMC Fruit Market: गणेशोत्सवात फळांचा बाजार फुलला! मुंबई APMC मध्ये १३० कोटींची उलाढाल; दरही वाढले

किरकोळ बाजारात फळाचे दर दुप्पट, तर मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये घाऊकपेक्षा ३० टक्के अधिक दर

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र पाटील

नवी मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवाच्या दहा दिवसात मुंबई एपीएमसीच्या घाऊक फळ बाजारात तब्बल १२५ ते १३० कोटींच्या फळांची विक्रीतून उलाढाल होईल, अशी माहिती घाऊक फळ व्यापारी आणि एपीएमसी संचालक संजय पानसरे यांनी पुढारीशी बोलताना दिली.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत १ हजार गाड्या फळांची आवक केवळ गणेशोत्सवासाठी होते.

ही आवक सुमारे ७ हजार टन एवढी आहे. त्यामध्ये पपई, सिताफळ, डाळिंब, सफरचंद, कलिंगड, केळी, पेर, चिकू, मोसंबी आणि वेलची केळीचा समावेश आहे. यापैकी सफरचंद,चिकू, केळी, मोसंबी, पेरला गणेशोत्सवात सर्वाधिक मागणी आहे. गिफ्टसाठीही उत्सव काळात याच फळांचे बॉक्स तयार करुन गणेशोत्सव मंडळांकडून मानकऱ्यांना प्रसाद म्हणून दिले जातात. त्‍याचीही भर वाढत्‍या मागणीत पडली असून किरकोळ बाजारात फळांचे दर वाढले आहेत.

सर्वच फळे १२० ते २५० रुपये किलोच्या दराने विकली जात आहेत. त्यामुळे फळे घेताना गणेश भक्तांना महागाईचा फटका बसला आहे. शिवाय क्रॉफर्ड मार्केटमध्ये एपीएमसी घाऊक बाजारातील दराच्या ३० टक्के अधिकचे दर असल्याचे व्यापारी पानसरे यांनी स्पष्ट केले.

याशिवाय वेलची केळी महाग असली तरी या केळींना मोठी मागणी आहे. श्रावण महिन्यापासून फळांच्या किमती चढ्या राहिल्या आहेत. त्यातच आत्ता गणेशोत्सवात फळांना मागणी वाढली असताना फळांना अधिक भाव आला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात भारतीय सफरचंदांचा हंगाम असतो. सध्या घाऊकला सफरचंद अगदी १०० ते १२०रुपये किलो आहेत. तर किरकोळला हेच सफरचंद १८० ते २०० रुपये किलो दराने विक्री केले जात आहेत. मुंबईच्या बाजारात सध्या उपलब्ध असलेली सफरचंदे हिमाचलातून येत आहेत.

पूर्वी घरोघरी देवदर्शनाला जाताना मिठाईऐवजी फळे घेऊन जाणे सर्वाना परवडत असे. मात्र आत्ता वाढत्या किमतीमुळे फळे महाग वाटू लागली आहेत. घाऊक बाजारातच फळांचे दर चढे असल्याने किरकोळ बाजारात फळे आणखी महाग झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT