Bombay High Court file photo
मुंबई

Maharashtra Anti Conversion Law: बुरख्यातील फोटो म्हणजे धर्मांतराचा पुरावा नाही; मुंबई न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

बुरख्यातील छायाचित्र आणि निकाह पत्रिकेवरील बदललेले नाव म्हणजे धर्मांतराचा पुरावा नाही, असे सत्र न्यायालयाचे निरीक्षण.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्र धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत मुंबईत दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्यातील २६ वर्षांच्या तरुणाला मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. ए. साने यांनी तरुणीचे केवळ बुरखा परिधान केलेले छायाचित्र आणि निकाहाच्या निमंत्रण पत्रिकेवर बदललेले नाव असणे, म्हणजे धर्मांतर झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे निरीक्षण नोंदवत संशयिताला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

२२ वर्षांच्या तरुणीच्या आईने संशयिताने लग्‍नाचे आमिष दाखवून आणि ब्रायडल मेकअप व्यवसायासाठी आर्थिक मदतीचे प्रलोभन देऊन तिचे इस्लाम धर्मात जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप करत मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्यांतर्गत (धर्मांतरविरोधी कायदा) गुन्हा दाखल केला.

संशयिताच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीवेळी न्यायालयाने अर्जदार आणि तरुणी सज्ञान असून, कोरोना काळापासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी विवाह निबंधकांना रीतसर पूर्वसूचना देऊन १६ ऑक्टोबरला विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्‍न केल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे.

निकाह लावणाऱ्या मौलवीच्या नोंदवहीत संशयिताच्या संदर्भात कोणतीही नोंद नाही. तसेच, निमंत्रण पत्रिकेवर तरुणीचा उल्लेख आयेशा असणे आणि तिचे बुरख्यातील छायाचित्र असणे, हे धर्मांतर झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही, असे निरीक्षण नोंदवत संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT