मुंबई :
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी )वाडीबंदर परिसरातून दोन जणांना अटक करून शुक्रवारी रात्री एमडी निर्मितीसाठी वापरले जाणारे २१० किलो द्रवरूप नियंत्रित रासायनिक पूर्वघटक (२-ब्रोमो-४-मेथिलप्रोपिओफेनोन ) जप्त केले.
या आधी आग्रीपाडा येथून १४ किलो एमडी (मेफेड्रोन) आणि लिक्विड एमडी जप्तीची कारवाई झाल्याने मुंबई परिसरात एमडी तयार करणाऱ्या कारखान्याचे धागेदोरेच हाती आले आहेत. या प्रकरणात एएनसी कांदिवली युनिटने एकूण अटक आरोपींची संख्या सहावर पोहोचली आहे.
एका तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवारी वाडीबंदरला सापळा रचण्यात आला आणि दोघांकडून एमडी निर्मितीसाठीचे २१० किलो द्रवरूप रसायन जप्त करण्यात आले.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, एवढ्या मोठ्या प्रमाणात रासायनिक पूर्वघटकाचा साठा केवळ किरकोळ विक्रीसाठी नसून, त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर एमडी तयार करण्यासाठी होऊ शकतो. या रसायनाचा पुरवठा कुठून झाला, ते कोणासाठी आणले जात होते, याचा तपास सुरू आहे.
यापूर्वी आग्रीपाडा प्रकरणात १४ किलो एमडी आणि लिक्विड एमडी जप्त करण्यात आले होते. या संपूर्ण मुद्देमालाची अंदाजे किंमत ५० कोटी ७४ लाख ६८ हजार ३१० रुपये इतकी आहे. पोलिसांनी अटक झालेल्या सहा आरोपींची एकत्रित चौकशी सुरू केली असून, त्यातून रॅकेटच्या 'अप्पर लिंक'पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आता या रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांची, मोबाईल फोनमधील माहिती, कॉल डिटेल रेकॉर्ड, बँक व्यवहार आणि डिजिटल पुराव्यांचीही छाननी केली जाणार आहे. तसेच हे रॅकेट इतर राज्यांतील अंमली पदार्थ उत्पादक किंवा पुरवठादारांशी जोडलेले आहे का, याचाही तपास सुरू आहे.