Airport Traffic Diversion Mumbai pudhari photo
मुंबई

Airport Traffic Diversion Mumbai : मुंबईची विमान वाहतूक नवी मुंबई विमानतळाकडे

१ ऑक्टोबरपासून वाहतुकीत बदल; १५ जानेवारीपासून टर्मिनलचे पाडकाम

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ वरील एक तृतीयांश वाहतूक लवकरच नवी मुंबई विमानतळाकडे वळवण्यात येणार आहे. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ ब येथील उत्तर विभागाचे पाडकाम सुरू होणार असल्याने १ ऑक्टोबरपासून वाहतुकीत बदल लागू करण्यात येणार आहेत. या संदर्भातील प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणाने केंद्र शासनाकडे पाठवला आहे.

जुन्या मुंबई विमानतळाचे टी १ - अ, टी - १ ब असे भाग आहेत. यापैकी टी १ अ या इमारतीचा वापर २००५ पर्यंत भारतीय विमानकंपन्यांकडून केला जात होता. त्यानंतर किंगफिशर एअरलाइन्सकडूनही याचा वापर सुरू झाला. किंगफिशरची विमानसेवा बंद झाल्यानंतर ही इमारत गो एअर कंपनीला देण्यात आली. त्यानंतर काही वर्षांनी गो एअर आणि एअर इंडिया या कंपन्यांचे कामकाज टी १ ब आणि टी २ येथून सुरू करण्यात आले. त्यामुळे टी १ अ ही इमारत प्रवाशांसाठी बंद करण्यात आली. २०१७ पासून टी १ ब हीच इमारत टी १ म्हणून ओळखली जाते.

टी १ अ इमारतीचे पाडकाम नोव्हेंबर २०२५पासून सुरू करण्यात आले. सध्या कार्यान्वित असलेल्या टी १ ब म्हणजेच टर्मिनल १चे बांधकाम सुरक्षित न राहिल्याच्या कारणास्तव हे टर्मिनल पाडण्याचे आदेश विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने दिले आहेत. सप्टेंबर २०२८पर्यंत या टर्मिनलची पुनर्बांधणी केली जाणार आहे. सध्या मुंबईतील विमान फेऱ्यांसाठी आगाऊ नोंदणी केलेल्या ग्राहकांच्या उड्डाण स्थळामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

प्रवासी क्षमता वाढणार

टर्मिनल १ मधून दरवर्षी १ कोटी ५० लाख प्रवासी प्रवास करतात. नव्याने उभारण्यात येणाऱ्या टर्मिनलमध्ये २ कोटी प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असेल. टर्मिनल २ मधून दरवर्षी ४ कोटी प्रवासी प्रवास करतात. दोन्ही टर्मिनल्सवरून दररोज ९५० विमान फेऱ्या चालवल्या जातात.

वाहतुकीतील बदल

  • १ ऑक्टोबर २०२६ - मुंबई विमानतळावरील एक तृतीयांश वाहतूक नवी मुंबई विमानतळाकडे वळवली जाईल.

  • २५ ऑक्टोबर २०२६ - टर्मिनल १ मधून चालवल्या जाणाऱ्या विमान फेऱ्यांपैकी एक तृतीयांश फेऱ्या टर्मिनल २ मधून चालवल्या जातील.

  • १५ जानेवारी २०२७ - टर्मिनल १ ब येथील उत्तर भागातील पाडकामाला सुरुवात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT