मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ चा पुनर्विकास हाती घेतला जात असून, तेथील आंतरदेशीय म्हणजेच स्थानिक विमान उड्डाणे टर्मिनल २ वर समायोजित करण्यासाठी आठवड्याला २६५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे मुंबईतून नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करण्याचा बेत केंद्र सरकारने रोखला आहे.
सर्व एअरलाईनसोबत पुन्हा सविस्तर चर्चा करून या स्थलांतराचा नवा आराखडा देण्याचे आदेश नागरी उड्डाण मंत्रालयाने विमानतळाचे संचलन करणाऱ्या कंपनीला (अदानी) दिले आहेत.
याचा अर्थ आठवड्याला २६५ आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबईत स्थलांतरित करण्यासाठी २५ ऑक्टोबरची डेडलाईन देण्यात आली होती, ती बारगळली आहे.
टर्मिनल-२ वरून आठवड्याला ७३० आंतरराष्ट्रीय विमाने उडतात. अदानी एअरपोर्ट होर्डिंगच्या स्थलांतर आराखड्यानुसार, यापैकी सर्वाधिक २२४ पैकी ७४ उड्डाणे इंडिगोची नवी मुंबईतून होणार होती.
एअर इंडियालाही ३३ उड्डाणे तर अकासा एअरला ११ उड्डाणे नवी मुंबईतून करावी लागणार होती. या स्थलांतराच्या आराखड्याचा फटका ४६ एअरलाईन्सना बसणार होता. देशांतर्गत उड्डाणांसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबईत हलवण्यास सर्वच एअरलाईन्सनी विरोध केल्यानंतर हे प्रकरण दिल्ली दरबारी पोहोचले.
मंगळवारी झालेल्या बैठकीत या स्थलांतराचा नवा आराखडा २० ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश नागरी उड्डाण मंत्रालयाने दिले होेते. मात्र, बुधवारी या संपूर्ण स्थलांतर प्रक्रियेला मंत्रालयाने ब्रेक लावला.
टर्मिनल-१ चा पुनर्विकास आवश्यक असला तरी टर्मिनल-२ वरील आंतरराष्ट्रीय विमाने अशी झटपट नवी मुंबईला हलवता येऊ शकत नाहीत. तसे केल्यास सर्वच एअरलाईन्सचा हिवाळी हंगामच धोक्यात येऊ शकतो.
हा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो आणि मार्चला संपतो. याशिवाय नवी मुंबई विमानतळावरील अडचणींकडेही एअर लाईन्सनी लक्ष वेधल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नवी मुंबईला होऊ घातलेले स्थलांतर रोखले.