Mumbai Airport Flight Shifting pudhari photo
मुंबई

Mumbai Airport Flight Shifting : मुंबईतून १४ विदेशी उड्डाणे बंद?

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १चा पुनर्विकास हाती घेण्यात आला असून येथील विमान उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित केली जाणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १चा पुनर्विकास हाती घेण्यात आला असून येथील विमान उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित केली जाणार आहेत. याला आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांचा विरोध असून त्यांनी सहकार्य न केल्यास १४ आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे मुंबई विमानतळावरून बंद करण्याचा विचार केला जात आहे.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे (एमआयएएल) मुख्य विमानतळ अधिकारी विष्णू मोहन झा यांनी नागरी विमान वाहतूक सचिव समीर कुमार सिन्हा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, विमान कंपन्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत स्वेच्छेने मुंबई विमानतळावरील स्लॉट नवी मुंबईत हलवण्याचा प्रस्ताव देण्यास सांगितले होते. अन्यथा या १४ ठिकाणांसाठीचे सर्व स्लॉट मुंबईतून वगळले जातील. यामुळे मुंबई महानगर प्रदेशात एकाच शहरासाठीची उड्डाणे दोन विमानतळांवर विभागली जाणार नाहीत.

केवळ एकाच विमानतळावरून होतील. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ होणार नाही आणि स्थलांतर अधिक सुलभ होईल. मुंबई विमानतळाचे जुने टर्मिनल १ पुनर्विकासासाठी बंद केले जाणार आहे. सुरुवातीला २६ ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये एक तृतीयांश कपात करण्याचा पर्याय एमआयएएलने विमान कंपन्यांना दिला होता.

ही एक तृतीयांश आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवी मुंबईला स्थलांतरित करावीत किंवा पुनर्विकासाच्या चार वर्षांच्या काळात ही सेवा तात्पुरती स्थगित करावी, असे दोन पर्याय देण्यात आले होते. यावर विमान कंपन्यांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला हस्तक्षेप करावा लागला. यानंतर विमान वाहतुकीचे स्थलांतर उन्हाळी सत्रापर्यंत पुढे ढकलले. आता नव्‍या पत्राने पुन्हा हा विषय उभा राहिला आहे.

ही उड्डाणे रद्द होणे शक्य

बहरीन, दम्मम, ढाका, दोहा, फुजेराह, जकार्ता, जेदाह, काठमांडू, कुवेत, मदिना, मस्कत, रास अल खैमाह, रियाध, शारजाह भारतीय कंपन्यांनी पुढील काही महिन्यांत या १४ ठिकाणांची उड्डाणे नवी मुंबईत हलवण्याची घोषणा केली आहे. मात्र परदेशी विमान कंपन्या अद्याप राजी झालेल्या नाहीत. एअरलाइन ऑपरेटर्स कमिटीनेदेखील सचिवांना पत्र लिहून मंत्रालयाने पुन्हा हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT