Mumbai Airport Flight Shift pudhari photo
मुंबई

Mumbai Airport Flight Shift : मुंबईचे ५० लाख विमान प्रवासी नवी मुंबईकडे वळवणार

टर्मिनल-१ ते नवी मुंबई स्थलांतराचा आराखडा २० ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली / नवी मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ वरील विमान वाहतूक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित करण्याचा ठोस आराखडा २० ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी दिले.

दिल्लीत या स्थलांतरासंदर्भात निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सचिवांनी बोलावलेल्या बैठकीस अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे नेतृत्व, भारतीय विमानतळ प्राधिकरण, फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्स आणि विविध देशांतर्गत विमान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सुमारे ९० मिनिटांच्या बैठकीत इंडिगो, एअर इंडिया, अकासा सह सर्व देशांतर्गत विमान कंपन्यांनी गेल्या 18 महिन्यांपासून विमानतळ संचालकाशी मुंबई ते नवी मुंबई स्थलांतराबाबत चर्चा सुरू असल्याचे मान्य केले.

टर्मिनल १ वरून नवी मुंबई विमानतळाकडे विमानांचे स्थलांतर करण्यासाठी काही आठवड्यांची मुदतवाढ देण्याचाही प्रस्ताव या बैठकीत आला. या संदर्भात पुढील बैठक १३ ऑक्टोबर रोजी नागरी हवाई वाहतूक सचिवांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

या बैठकीत मुंबई विमानतळावरील ५० लाख आंतरराष्ट्रीय प्रवाशांना नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करण्याचा आराखडा निश्चित केला जाईल. त्यानंतर अंतिम आराखड्यावर चर्चा करण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंत आणखी एक बैठक होईल, असे सूत्रांनी सांगितले.

टर्मिनल २ वरील कपातीचे काय?

  • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ चा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने केला जाणार असून, त्यासाठी या टर्मिनलवरील सर्व विमान उड्डाणे नवी मुंबई विमानतळाकडे वळवली जाणार आहेत.

  • त्यातच मुंबईच्या टर्मिनल-२ वरील आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाण संख्येत तब्बल ३३ टक्के कपात करण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने त्यास विमान कंपन्यांनी विरोध केला. या कपातीमुळे टर्मिनल २ चे स्थान धोक्यात येण्याचीच भीती व्‍यक्त होऊ लागली. या संदर्भात मंगळवारच्या बैठकीत काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.

  • मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ च्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या पुनर्विकासानंतर त्याची क्षमता वार्षिक १५ दशलक्ष प्रवाशांवरून २० दशलक्ष प्रवाशांपर्यंत वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT