मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नेटवर्क शनिवारी अचानकपणे ठप्प झाले. त्यामुळे चेक-इन व बोर्डिंग ‘मॅन्युअल मोड’वर करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
विमानतळावरील सर्व्हरच डाऊन झाल्याने विमानांचे उड्डाणही उशिराने होऊ लागलेे. या तांत्रिक अडचणीमुळे इंडिगो, एअर इंडिया, अकासा, विस्तारा या विमान कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला. तांत्रिक बिघाडामुळे मुंबई विमानतळावर हळूहळू प्रवाशांची मोठी गर्दी वाढली.
हा तांत्रिक बिघाड तत्काळ दूर करून सर्व्हर पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशांनी लावून धरली.
मिळालेल्या माहितीनुसार या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे चेक-इन व बोर्डिंगची संपूर्ण प्रक्रिया ‘मॅन्युअल मोड’वर वळवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी वेळ होऊ लागला. हा तांत्रिक बिघाड निदर्शनास येताच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रशासनाकडून ही अडचण दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. विमानतळाच्या आयटी आणि कोअर टीमकडून नेटवर्क दुरुस्तीचे प्रयत्न सुरू झाले. या बिघाडामुळे सर्वच विभागांना एसओपीनुसार ‘कंटिजन्सी’ प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले.
सायंकाळी उशिरा बिघाड सिस्टीम दुरुस्त करण्यात आली. या सर्व प्रक्रियेत प्रवासी मात्र खोळंबले आणि त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.